सीए अंतिम परीक्षेचा परिणाम घोषित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीएच्या अंतिम परीक्षेचा परिणाम घोषित करण्यात आला आहे. हा परिणाम नोव्हेंबर 2024 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा आहे. दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी हे या परीक्षेतील पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. हैद्राबादचा हेरंब माहेश्वरी आणि तिरुपतीचा ऋषभ ओस्टवाल यांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांना प्रत्येकी 508 गुण (84.67 टक्के) मिळाले आहेत.
अहमदाबादच्या रिया शहा या विद्यार्थिनीला तिसरा क्रमांक मिळाला असून तिला 501 गुण (83.5 टक्के) मिळाले आहेत. या परिक्षेला 49 हजार 459 विद्यार्थी बसले होते. त्यांच्यापैकी 11 हजार 500 जण उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे ग्रुप ए परीक्षेला 66,987 विद्यार्थी बसले होते. त्यांच्यापैकी 11 हजार 253 उत्तीर्ण झाले. एकंदर वर्षात 31 हजार 946 विद्यार्थ्यांनी सीए होण्यात यश मिळविले आहे. यंदा उत्तीर्णांचे प्रतिशत प्रमाण उत्तम होते. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या परीक्षेत दोन्ही ग्रुप्समध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या 30,763 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 134 (13.44 टक्के) इतकी होती. ही माहिती आयसीएआयचे अध्यक्ष सीए रणजीत कुमार अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आयसीएआयची माहिती आयसीएआय ही संस्था सीएची परीक्षा घेते. ही संस्था चार्टर्ड अकाऊंटंट्स् कायदा 1949 अनुसार स्थापन करण्यात आली आहे. भारतात चार्टर्ड अकाऊंटन्सी व्यवसायाचे नियमन आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेला विधिवत मान्यता आहे. या संस्थेच्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या 9.85 लाख इतकी असून या संस्थेच्या सदस्यांची संख्या 4 लाखांपेक्षा अधिक आहे. ही अकाऊंटन्सी क्षेत्रातील जगातली सर्वात मोठी संस्था असून. तिच्या कठोर गुणवत्ता निकषांसाठी सर्वपरिचित आहे.