वॉर्नरवरील ‘नेतृत्व बंदी’ सीएकडून मागे
वृत्तसंस्था/ सिडनी
डेव्हिड वॉर्नरने कर्णधारपद भूषविण्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेली आजीवन बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे या मोसमातील टी-20 बिग बॅश लीगमध्ये सदर निवृत्त कसोटीपटू सिडनी थंडरचे कर्णधारपद सांभाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
वॉर्नरला दक्षिण आफ्रिकेतील 2018 च्या सँडपेपर प्रकरणातील त्याच्या भूमिकेसाठी सदर शिक्षा मिळाली होती. त्याशिवाय एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती आणि स्टीव्ह स्मिथवर देखील अशीच शिक्षा भोगण्याचा प्रसंग आला होता. पिवळ्या सँडपेपरने चेंडू घासताना आणि कुरतडताना कॅमेऱ्यात पकडलेल्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टला तुलनेने कमी शिक्षा मिळाली होती. केपटाऊनमधील कसोटी सामन्यात हा प्रकार घडला होता.
परंतु वार्नरने आवश्यक निकषांची पूर्तता केली आहे असे मानणाऱ्या स्वतंत्र तीन सदस्यीय पुनरावलोकन समितीने शुक्रवारी त्याच्यावर नेतृत्व करण्याच्या बाबतीत घातलेली बंदी उठविली. वॉर्नर या महिन्याच्या सुऊवातीला स्वतंत्र समितीसमोर हजर झाला होता. भविष्यात नेतृत्वाच्या भूमिकेसाठी त्याला विचारात घेण्याच्या दृष्टीने आवश्यक निकष त्याने पूर्ण केले आहेत, असा निर्णय या समितीने दिला.
वॉर्नरच्या आदरयुक्त प्रतिसादाने तसेच तपशिलाने पुनरावलोकन समितीला प्रभावित केले असून समितीला एकमताने वाटले की, वर्तनाची जबाबदारी त्याने प्रामाणिकपणे स्वीकारली होती आणि त्याच्या कृत्याबद्दल त्याला अत्यंत पश्चात्ताप होत असल्याचे विधानही त्याने प्रामाणिकपणे केले होते. निर्बंध लागू झाल्यापासून वॉर्नरची वागणूक उत्कृष्ट राहिली आहे आणि त्याने लक्षणीय बदल केल्याचे दिसते. याचे एक उदाहरण म्हणजे तो आता विरोधी संघाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत नाही, असे समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
वॉर्नर आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारीत पाकिस्तानविऊद्ध खेळला होता. त्याने आपण यापुढे एकदिवसीय सामने खेळणार नाही, फक्त टी-20 प्रकार खेळणार असल्याचे जाहीर केलेले आहे. वरील घडामोडीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्याला मिळालेली वाढदिवसाची भेट देखील मानले जाऊ शकते. वॉर्नर रविवारी 38 वर्षांचा होणार आहे.