सी. शंकरन नायर यांच्यावर येतोय चित्रपट
अक्षय कुमार, अनन्या पांडे, माधवन झळकणार
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात महत्त्वाचा अध्याय जालियांवाला बाग नरसंहाराच्या कहाणीवर लवकरच चित्रपट येत आहे. करण जौहरकडून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून यात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे दिसून येणार आहे.
ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणारे दिग्गज बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. करण सिंह त्यागी यांच्याकडून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले जाणार आहे. हा चित्रपट 14 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. एक चर्चेत न राहिलेली कहाणी, एक न ऐकलेले सत्य अशी कॅप्शन देत या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. एका नरसंहाराला लपविण्याचा चकित करणारा प्रयत्न, ज्याने भारतातील आघाडीचे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांना ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात अभूतपूर्व लढाई लढण्यासाठी प्रेरित केले असे या पोस्टरमध्ये नमूद आहे.
या चित्रपटाची कहाणी द केस दॅट शॉक द एम्पायर या पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक रघू पल आणि पुष्पा पलट यांनी लिहिले आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असणार आहे. चित्रपटात शंकरन नायर यांची व्यक्तिरेखा अक्षय कुमार साकारणार आहे.
चेट्टूर शंकरन नायर हे भारतीय वकील आणि राजकीय नेते होते. त्यांनी 1906-08पर्यंत मद्रासचे अॅडव्होकेट जनरलच्या स्वरुपात, 1908-15 पर्यंत मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून, 1915-19 पर्यंत व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून काम केले होते.