रेल्वे कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणी ‘सी रिपोर्ट’
तपासात अपयश आल्याने रेल्वे पोलिसांनी न्यायालयाला सादर केला अहवाल : दोन वर्षांपूर्वी झाला होता खून
बेळगाव : धावत्या रेल्वेत चाकूने भोसकून रेल्वे कर्मचाऱ्याचा खून करण्यात आला होता. या घटनेत टीसीसह अन्य तिघे जण जखमी झाले होते. खुनाच्या घटनेला दोन वर्षे उलटली तरी मारेकऱ्याचा शोध लागला नाही. म्हणून रेल्वे पोलिसांनी नुकतेच न्यायालयात ‘सी रिपोर्ट“ सादर केले आहेत. 16 मे 2024 रोजी पुदुच्चेरी-दादर एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली होती. हुबळीहून मिरजेला जाताना अश्रफअली रफिकअहमद कित्तूर (वय 27) हे रेल्वेतील सिनियर टीटी तिकीट तपासत असताना एका अनोळखी तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या देवर्षी प्रेमनारायण वर्मा (वय 25) राहणार सिरसा, जि. झांशी, उत्तरप्रदेश या रेल्वे कर्मचाऱ्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला होता.
आणखी एक कर्मचारी शोएब व फळांचा व्यापारी सतीश हेही जखमी झाले होते. 16 मे 2024 रोजी 4.20 च्या सुमारास पुदुच्चेरी-दादर एक्स्प्रेस रेल्वे लोंढा रेल्वेस्थानक ओलांडल्यानंतर ही घटना घडली होती. सुमारे 40 ते 42 वर्षीय तरुण रेल्वेबोगीच्या दरवाजात उभा होता. प्रवाशांचे तिकीट तपासताना अश्रफअली यांनी त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली. त्यावेळी तुम्हाला मी तिकीट देणार नाही, असे सांगत भांडू लागला. रेल्वेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत पलायनाच्या प्रयत्नात असताना अश्रफअली यांनी त्याला पकडले. याचवेळी त्याने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. अश्रफअली यांनी त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली होती. रेल्वेत सफाई करणारा देवर्षी वर्मा (वय 25) या तरुणावर त्याने चाकू हल्ला केला.
फळविक्रेत्यासह आणखी दोघांवरही चाकू हल्ला करून रेल्वे खानापूर रेल्वेस्थानकाजवळ पोहोचताच धावत्या रेल्वेतून उडी टाकून त्याने केले होते. तेव्हापासून त्याच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांनी प्रयत्न केले. रेल्वे पोलिसांनी मारेकऱ्याचे रेखाचित्र प्रसिद्ध करून त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले होते. तामिळनाडूत तो अनोळखी तरुण रेल्वेत चढल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे पुदुच्चेरी ते मुंबईपर्यंतचे फुटेज ताब्यात घेऊन मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या मार्गावरील काही रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे तपासात अडथळे आले होते. सतत शोध घेऊनही मारेकऱ्याचा शोध लागला नाही त्यामुळे रेल्वे पोलिसांनी न्यायालयात सी रिपोर्ट सादर केला होता.
गुन्हेगारी प्रकरणाचा तपास न लागल्यास सी रिपोर्ट सादर
एखाद्या गुन्हेगारी प्रकरणाचा तपास लागला नाही तर न्यायालयात तपास अधिकारी सी रिपोर्ट सादर करतात. त्यानंतर त्या प्रकरणाचा छडा लागला तर पुन्हा त्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करता येते. सध्या धावत्या रेल्वेतील खून प्रकरणातही सी रिपोर्ट सादर करण्यात आले आहे.