पोलीस संरक्षणात बायपासच्या कामाला सुरुवात
विरोध झुगारत काम सुरू : शेतकऱ्यांमध्ये संताप
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम मंगळवारी रोखण्यात आले. परंतु बुधवारी मोठ्या पोलीस फौजफाट्यात कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. जुने बेळगाव-अलारवाड येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना फिरकूही देण्यात आले नाही. तीव्र विरोध झुगारून कामाला सुरुवात करण्यात आल्याने शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधात शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काम थांबविण्यात आले. परंतु ही स्थगिती उठविण्यात आली. झिरो पॉईंट निश्चित होण्यापूर्वीच मंगळवारपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्यांनी रस्ता करणाऱ्या कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून रस्त्याचे काम बंद पाडले.
मंगळवारी काम बंद ठेवण्यात आले असले तरी बुधवारी सकाळपासून अलारवाड ब्रिज येथे पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. यंत्रसामग्री दाखल झाल्यानंतर पोलीस संरक्षणात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांनी विरोध दर्शवूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नाराजी व्यक्त करत यापुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.