गर्भवती महिलेवर बायपास शस्त्रक्रिया
अरिहंत हॉस्पिटलमध्ये जगातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वी : गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे महिला-अर्भकाला जीवदान
बेळगाव : एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बायपासची (ओपन हार्ट सर्जरी) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून महिला आणि अर्भकाला नामवंत हृदयरोग तज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवदान दिले आहे. अशा पद्धतीची ही भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली शस्त्रक्रिया आहे. येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली असून हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, अनिता सात महिन्यांच्या गर्भवती आहेत. अचानक छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीअंती त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजिस असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कुटुंबीयांनी स्वत:ला सावरून अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. एम. डी. दीक्षित यांची भेट घेतली. त्यांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मात्र, ही दुर्मीळ व अवघड शस्त्रक्रिया असून हा धोका स्वीकारण्यास कुटुंबीय तयार असल्यास शस्त्रक्रिया करण्याची ग्वाही दिली.
अनिता यांच्यावर 1 जानेवारी रोजी डॉ. दीक्षित यांच्या पुढाकाराने व डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. व्ही., डॉ. निखिल दीक्षित, डॉ. अविनाश लोंढे यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर अनिता यांची प्रकृती स्थिर असून गर्भालाही धोका नाही हे पाहूनच 8 जानेवारी रोजी अनिता यांना डिस्चार्ज देण्यात आला. यासंदर्भात डॉ. दीक्षित म्हणाले, सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचे दडपण आणि आव्हान आमच्यासमोर होते. परंतु आम्ही ते स्वीकारले आणि ही अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी केली, याचा आम्हाला अभिमान असून सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. गर्भवतीची ओपन हार्ट सर्जरी करणे धोकादायक तशी बाब आहे. आजवर संपूर्ण जगभरात अशी शस्त्रक्रिया झालेली नाही. पण अरिहंत हॉस्पिटलने गर्भवती महिलेची ओपन हार्ट सर्जरी डॉ. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करून दोघांचीही काळजी घेतली आहे. याबद्दल अरिहंत हॉस्पिटलचे कौतुक होत आहे.