बीवायडी भारतात करणार कार्सचे उत्पादन
कंपनी इलेक्ट्रीक कार्सचे घेणार उत्पादन : तेलंगानात होणार कारखाना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी इलेक्ट्रिक वाहन कंपनी बीवायडी यांनी भारतात वाहन उत्पादन प्रक्रियेला सुरुवात करण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती कंपनी तेलंगानामध्ये हैदराबादजवळ कारखाना स्थापन करून करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
हैदराबादजवळ पाहणी
यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांची राज्य सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. बीवायडी कंपनीच्या प्रतिनिधींनी अलीकडेच हैदराबादजवळील कारखान्याच्या परिसराचा पाहणी दौरा केला असून लवकरच यासंदर्भात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी कंपनी वाहनांची निर्मिती त्याचप्रमाणे वाहनांच्या घटकांची निर्मितीदेखील करण्याची योजना कंपनी बनवत आहे. गेल्या दोन वर्षापासून कंपनी भारतात कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होती. यासंदर्भात कंपनी चाचपणीही करत होती.
भारतात स्पर्धा
सध्याला कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची आयात चीनमधून करते आहे. आयात शुल्कामुळे कंपनीला आपल्या वाहनांच्या किमती अधिक वाढवाव्या लागत आहेत. खर्चामध्ये कपात करण्यासोबतच विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी कंपनी भारतामध्ये निर्मिती प्रकल्प उभारण्याचा विचार करत होती. आता तेलंगानात प्रकल्पाला मंजुरी मिळाली तर कंपनी याठिकाणी वाहनांची निर्मिती करुन भारतीय बाजारात मोठ्या संख्येने उतरवू शकेल. इतर भारतीय इलेक्ट्रीक वाहनांसोबत बीवायडीची स्पर्धा पाहायला मिळेल.