बंपर उत्पादनामुळे ब्याडगीचा दर घसरला
160 ते 300 रुपये किलो,गृहिणींची तिखटासाठी धडपड
बेळगाव : यंदा राज्यात ब्याडगी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले असल्याने बाजारात मिरचीचे दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला असून ग्राहकांकडून मात्र मिरची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली जात आहे. मिरचीचा दर गडगडल्याने शेतातील मिरची तोडावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर तोडलेल्या मिरचीला दर मिळत नसल्याने बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दरात मिरचीची खरेदी केली जात आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी मिरचीचे दर गगनाला भिडले होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात ब्याडगी मिरचीचे पीक घेण्यात आले असल्याने मोठ्या प्रमाणात मिरची बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे दर उतरले आहेत. राज्यात चालू हंगामात 1 लाखांहून अधिक हेक्टरमध्ये ब्याडगी मिरचीची लागवड करण्यात आली आहे. ब्याडगी, गुंटूर, संकेश्वरी ब्याडगी मिरचीसह विविध जातींच्या मिरच्या तोडणीला आल्या आहेत. पण दर नसल्याने मिरचीची लागवड करण्यासाठी झालेला खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या बाजारपेठेत 160 ते 300 रुपये किलो दराने ब्याडगी मिरचीची विक्री केली जात आहे. दर कमी झाला असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यात विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रांचा मोसम आहे. मिरची खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे.