For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्मयोगी फळाचा त्याग करून कर्मे करत असल्याने त्याची चित्तशुद्धी होत राहते

11:59 PM Mar 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्मयोगी फळाचा त्याग करून कर्मे करत असल्याने त्याची चित्तशुद्धी होत राहते
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत म्हणाले, कर्मयोगी ईश्वरी प्रेरणेने केलेली कर्मे ईश्वराला अर्पण करत असल्याने तो पापासून अलिप्त असतो. ज्या घराण्यात मनुष्य जन्माला येतो त्यानुसार त्याला कर्मे करावी लागतात. काहीवेळा ती कर्मे निषिद्ध असली तरी, तो ती प्रामाणिकपणे करत असतो. काम करत असताना तो देवाचे स्मरण करत असतो. नाम घेत केलेले कर्म निषिद्ध असले तरी त्या कर्माचे पाप त्याला लागत नसते. एव्हढेच नव्हे तर तो प्रेमाने नाम घेत आहे हे पाहून देवही तेथे हजर राहून त्याला मदत करत असतो. ईश्वराच्या दृष्टीने उच्च नीच असा भेदभाव कधीच नसतो. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, जो मनापासून नाम घेतो त्याच्या हातून दुष्कृत्ये घडू शकत नाहीत. त्यामुळे तो करत असलेली सगळी कर्मे सत्कृत्ये ह्या सदरातच मोडतात.

पुढे भगवंत सांगतात, कर्मयोगी देह, मन, बुद्धी आणि इंद्रियानी जी कर्मे करतो तो ती केवळ आत्मशुद्धीसाठी करत असल्याने त्याला त्यापासून फळाची अपेक्षा नसते.

Advertisement

देहा-मनाने बुद्धीने इंद्रियांनी हि केवळ । आत्म-शुद्ध्यर्थ नि:संग योगी कर्म अनुष्ठिती ।। 11।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, कोणतेही कर्म सुरु करण्यापूर्वी त्या कर्माचे विचार मनात येतात आणि ते कसे पार पडावे ह्याबद्दल बुद्धी मार्गदर्शन करते परंतु काही वेळा कर्म बुद्धीला समजण्यापूर्वी व मनात त्यासंबंधी विचार येण्याच्या अगोदर केले जाते. अशा कर्मपूर्तीला कायिक कर्म असे म्हणतात. ताह्या मूलाचे उदाहरण घे, ते दुपट्यावर पडल्या पडल्या हातपाय हालवत असते. त्यावेळी त्याच्या मनात त्याबद्दल कोणतेही विचार नसतात. त्यामुळे बुद्धीकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याप्रमाणे योग्यांच्या मनात ते करत असलेल्या कर्माबद्दल कोणतेही विचार येत नसतात कारण त्यांनी मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केलेली असते. ईश्वर जशी प्रेरणा देईल त्याप्रमाणे त्यांच्या हातून कार्य घडत असते. त्यामुळे ते कसे पार पाडावे ह्याबद्दल त्यांना बुद्धीच्या मार्गदर्शनाची गरज नसते. अशा कर्मयोग्याला फळाची अपेक्षा नसल्याने तो जो जो कर्म करत राहतो तो तो त्याची चित्तशुद्धी होत राहते. हे कसे घडत असेल हे समजून घ्यायचे झाले तर एखादे तान्हे मूल दुपट्यावर हातपाय हलवत पडले असल्याचे दृश्य नजरेसमोर आणा. हातापायांच्या हालचाली त्याच्याकडून आपोआपच घडत असतात. त्यासाठी त्याच्या मनात कोणतेही विचार येत नसतात. योग्याचे कार्य असेच चालते. अशा कर्मपूर्तीला कायिक कर्म असे म्हणतात. कर्मयोगी केवळ ईश्वरी प्रेरणेनुसार शरीराने कर्म करत असल्याने त्यांना त्याचे बंधन लागू होत नाही.

सामान्य माणसाची परिस्थिती पाहू जाता असे लक्षात येते की, योग्याप्रमाणे त्याचेही शरीर जरी पंचमहाभूतांचे बनलेले असले तरी त्याचे मन आणि बुद्धी कार्यरत असतात. त्याला होणाऱ्या इच्छेनुसार त्याचे मन स्वप्नांचे इमले रचत असते आणि बुद्धी ते इमले प्रत्यक्षात कसे आणावेत त्याचे मार्गदर्शन करत असते. आश्चर्य म्हणजे, वासनेचा विस्तार एव्हढा आहे की, ती देहाला जागृती येऊ न देता सुखदु:खाचा भोग भोगवते. ह्याला मानसिक कर्म म्हणतात. ह्याचा इंद्रियांना पत्ता नसतो.

क्रमश:

Advertisement

.