यज्ञ करून योगी त्याच्या शुद्ध स्वरूपात विरघळून जातो
अध्याय चौथा
ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मी कर्ता आहे हे विसरणे फार महत्वाचे आहे. तो विसर पडला की, आत्मबुद्धी उदय पावते. हे घडून येण्यासाठी योगी इंद्रियांना त्यांच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात.
माणसाची इंद्रिये त्याच्या मनात येणाऱ्या आवडीच्या गोष्टींचे त्याला प्रलोभन दाखवत असतात. सामान्य माणसाला त्या प्रलोभनांचा मोह पडतो आणि त्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी तो प्रयत्न करू लागतो. गीता, म्हणते जेव्हा जेव्हा माणसाला मोह होतो तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो.
गीतेची सुरवातच मुळी अर्जुनाला सग्यासोयाऱ्यांचा मोह पडल्याने झाली आहे. मोह न होण्यासाठी, योगी देहसुखाचा त्याग करून, धारणा ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग योगाच्या तीन अंगातून प्रयत्न करत असतात. अर्थात त्याआधी त्यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ह्या पहिल्या पाच अंगाचा कसून सराव केलेला असतो. ह्या सर्व साधनेमधून इंद्रीयांवर जय मिळवणे हे उद्दिष्ट असते. त्यासाठी योगी जे जे प्रयत्न करतात त्या सगळ्यांना गीता यज्ञ असे नाव देते. यज्ञ करणे म्हणजे त्याग करणे. योगी यज्ञाच्या माध्यमातून आत्मसुखाच्या इच्छेने दैवताची रात्रंदिवस उपासना करतात. त्याकाळात त्यांच्या भरणपोषणाची जबाबदारी भगवंतानी घेतलेली असल्याने त्यांना देहाच्या पोषणाविषयी चिंता वाटत नाही. काही योगी संयमाच्या अग्नीत इंद्रिये आणि प्राण अर्पण करून टाकतात. संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले आत्मज्ञानाचे सुख, योगी सेवन करतात. अशा या निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांनी कित्येक जण आजपर्यंत मुक्त होऊन गेलेले आहेत. त्या सर्वांना मोक्ष हे फल मिळते.
काही यज्ञाना ‘द्रव्ययज्ञ’ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामुग्रीने उत्पन्न होतात. कित्येक ‘योगयज्ञ’ म्हणून सांगितले आहेत. कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात, त्यास ‘वाग्यज्ञ’ असे म्हणतात. ज्यात ज्ञानाने ब्रह्म जाणता येते, तो ‘ज्ञानयज्ञ’ होय. काही योगी आपले हवन आपल्यातच करतात म्हणजे आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात. कित्येक योगी पूरक, रेचक, कुंभक ह्या प्राणायामाचे हवन करून यज्ञ करतात. काही योगी आहाराचे नियमन करतात आणि प्राणाचा प्राणवायूत होम करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात. याप्रमाणे हे सर्व यज्ञ करणारे मोक्षाची इच्छा करतात. यज्ञ करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालविले असतात. यज्ञात त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे त्यांचे मूळचे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते. त्यामुळे यज्ञ व यज्ञकर्ता हा द्वैतभाव शिल्लक राहत नाही. यज्ञ करणाऱ्याची इच्छा पूर्ण झाली की, त्यासाठी त्याने वापरलेल्या साधनांचे कार्य संपुष्टात येते. योगी त्याच्या शुद्ध स्वरूपात विरघळून गेल्यामुळे त्याच्या यज्ञाक्रियांचे काम संपते. त्यांची अष्टांगयोग साधना पूर्ण होते. अशावेळी त्याचे मन निर्विचार झालेले असल्याने त्याच्या मनात कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा प्रवेश होत नाही. यज्ञकर्त्याच्या सर्व वासना निमल्यामुळे मी म्हणजे हा देह ह्या कल्पनेचा समूळ नाश झालेला असल्याने तो संपूर्ण निरिच्छ होतो.
क्रमश: