कर्मयोगाची तत्वे पाळून मनुष्य पाप-पुण्याच्या मुक्त
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, समत्वबुद्धीमुळे पुर्ण, अपूर्ण, चांगल्या, वाईट कर्माविषयी मनाचा समतोलपणा राखता येतो. हीच योगस्थिती होय. समत्वबुद्धी म्हणजे ज्याच्यासाठी जे करणे योग्य आहे ते करणे. म्हणून समत्वबुद्धीच्या आधारे केलेल्या कर्माच्या तुलनेत फळाच्या इच्छेने केलेले कर्म कधीही निकृष्ट ठरते. समत्वबुद्धीने निर्णय घेण्यासाठी नितीशास्त्राचा आधार घेता येतो. मनुष्य करत असलेल्या भेदभावामुळे समत्वबुद्धीने निर्णय घेण्याचे धाडस त्याला होत नाही. ज्याला तो आपला समजतो त्याच्या मनासारखे व्हावे म्हणून चुकीचे निर्णय घेतो. त्याउलट ज्याला तो परका समजतो त्याच्यासाठी जे करणे उचित आहे तेही तो करत नाही. अर्जुन त्याच्या नातेवाईकांच्या मोहाने, तसेच त्यांना युद्धात मारले तर त्यांच्या मृत्यूचे पाप आपल्या माथी बसेल ह्या भीतीने, त्यांचे गैरवर्तन पाठीशी घालून त्यांच्याशी युद्ध करण्याचे टाळत होता. अर्जुनाचा हा विचार भगवंताना अजिबात पटला नाही कारण तो निर्णय त्याने समत्वबुद्धीचा वापर करून घेतलेला नव्हता. म्हणून भगवंत म्हणतात, तू निर्णय घेताना समत्वबुद्धीचा आधार घे म्हणजे घेतलेला निर्णय योग्य ठरेल. तुला वाटतंय म्हणून तू युद्ध न करण्याचा निर्णय घेऊ नकोस. तुझ्या ह्या निर्णयाला श्रेष्ठ अशा समत्वबुद्धीचा आधार नसल्याने ते हीन कर्म होईल.
समत्वबुद्धीचा वापर करून कर्म केल्यास काय फायदा होतो ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणाले, समत्वबुद्धीने घेतलेले निर्णय नितीशास्त्राला धरून असल्याने योग्य असतात. त्यामुळे त्यानुसार केलेल्या कामाला चांगले किंवा वाईट असा शेरा पडत नाही. समत्वबुद्धीने घेतलेला निर्णय अचूकच आहे अशी खात्री झाल्याने मनुष्य निर्धास्त असतो त्यामुळे ते काम करण्यास आवश्यक असलेले कौशल्य त्याला सहजी प्राप्त होते.
येथ समत्व-बुद्धीने टळे सुकृत-दुष्कृत । समत्व जोड ह्यासाठी ते चि कर्मात कौशल ।। 50।।
समत्वबुद्धी जे करायला सांगेल ते मनाने मान्य केले की, त्यावर चित्तात चिंतन घडू लागते. अशा पद्धतीने बुद्धीचे आणि मनाचे एकमत झाले की, जे करणे योग्य आहे तेच मनुष्य करतो मग ते कृत्य समाजाच्या दृष्टीने कदाचित वाईटही असेल. चांगले, वाईट ह्या बाबी तुलनात्मक आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट चांगली वाटत असेल तर दुसऱ्याला कदाचित तीच गोष्ट वाईट दिसेल. एकमात्र नक्की, समत्वबुद्धीने घेतलेला निर्णय माणसाच्या आध्यात्मिक भल्याच्या दृष्टीने श्रेष्ठ असतो. आपला निर्णय आपल्या आध्यात्मिक भल्याच्या दृष्टीने योग्य आहे ह्याची खात्री झालेली असलेल्या माणसाला करत असलेल्या कर्मात आवश्यक ते कौशल्य प्राप्त होते.
सहसा माणसाचा कल बुद्धीचा सहारा न घेता त्याच्या फायद्याचा निर्णय घेण्याकडे असतो पण असा निर्णय तात्पुरत्या फायद्या-तोट्याचा विचार करून घेतला जात असल्याने, तो त्याच्या हिताचा असेलच असे नाही. हे माणसाने लक्षात घ्यावे ह्या उद्देशाने श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असा सल्ला दिला की, बुद्धीयोगच श्रेष्ठ आहे, म्हणुन फलेच्छा न धरता या योगाचे ठिकाणी तू निश्चल हो. त्यामुळे तुझी बुद्धी स्थिर होऊन तुझ्याकडून कर्मयोगाची तत्वे पाळून निर्णय घेतले जातील. त्यातून केलेल्या कर्मांना पाप-पुण्याची बाधा होत नाही. म्हणून कर्मयोगाची तत्वे पाळून जे निर्णय घेतात, तेच संसारातून पार पडून पाप-पुण्याच्या बंधनातून सुटतात.
क्रमश: