दोन मतदारसंघांत फेब्रुवारी-मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य
बेंगळूर : राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पुढील दोन-तीन महिन्यांत पोटनिवडणुका होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार एच. वाय. मेटी व शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन जागांसाठी निवडणूक आयोग पोटनिवडणूक घेणार आहे. बागलकोटचे आमदार एच. वाय. मेटी यांचे 3 नोव्हेंबर 2025 रोजी तर दावणगेरे दक्षिणचे आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांचे 14 डिसेंबर रोजी निधन झाले. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ अडीच वर्षे बाकी आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग रिक्त दोन जागांसाठी पोटनिवडणूक अधिसूचना जारी करणार आहे. आमदाराचे निधन, राजीनामा, फौजदारी प्रकरणांमध्ये शिक्षा झाल्यानंतर आमदारपद अवैध अशा प्रसंगी पोटनिवडणुका घेतल्या जातात. सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहार झाल्यास नवीन प्रतिनिधी निवडण्यासाठी पोटनिवडणूक घेतली जाते. कलम 154अ नुसार, एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असले तर त्या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात नाही. परंतु सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ अडीच वर्षे बाकी असल्याने रिक्त झालेल्या दावणगेरे दक्षिण व बागलकोट मतदारसंघांत पुढील दोन-तीन महिन्यात पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.