पोटनिवडणूक प्रचाराचा आजपासून उडणार धुरळा
राज्यात दोन ठिकाणी पोटनिवडणूक : दोन्ही पक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी
बेंगळूर : राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुका सत्ताधारी आणि विरोधी पक्षासाठी अत्यंत चुरशीच्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार असून दोन्ही पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी केली आहे. दोन्ही पक्षांचे नेते उमेदवारांच्या वतीने प्रचार करतील. दावणगेरे दक्षिण आणि बागलकोट येथील उमेदवारांच्यावतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री, आमदार, विधानपरिषद सदस्य, पक्षाचे नेते प्रचार करतील.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी यांच्यासह प्रचार यादीतील इतर नेते उमेदवारांसाठी मतयाचना करतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या बागलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेट देऊन उमेदवार उमेश मेटी यांच्यातर्फे मतयाचना करणार आहेत. अनेक गावांना भेट देऊन पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन ते मतदारांना करतील.
दोन दिवस बागलकोटमध्ये मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा पालकमंत्री मंत्री आर. बी. तिम्मापूर, आमदार, विधानपरिषद सदस्य आणि पक्षाचे नेते असतील. दावणगेरेमध्ये भाजपचे उमेदवार श्रीनिवास दास करियप्पा यांच्यातर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र मतयाचना करणार आहेत. प्रतिष्ठेची लढत बनलेली ही निवडणूक जिंकण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य, नेते रामचंद्र, माजी खासदार जी. एम. सिद्धेश, गायत्री सिद्धेश, माडाळू विऊपाक्षप्पा आणि इतर त्यांच्यासोबत असतील.
काँग्रेसचे उमेदवार समर्थ यांच्यातर्फे मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्यासह इतर नेते यापूर्वीच प्रचाराला सुऊवात केली आहे. खासदार डॉ. प्रभा मल्लिकार्जुन आणि आमदारांसह इतर अनेक विविध गावांमध्ये प्रचार करणार आहेत. यापूर्वीच प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप ऐकू आले आहेत. शनिवारी दावणगेरेला गेलेले चिक्कबळ्ळापूरचे आमदार प्रदीप ईश्वर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी शाब्दिक वाद झाला होता.