मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने मही-तळ
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना स्वधर्माचे आचरण केले असता कोणताही दोष न लागता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात. हा संग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास तर तूझ्या पूर्वजांनी मिळविलेली पुण्यकीर्ति घालवशील. सगळे जग तुझी निंदा करेल. तू आणखी एक गोष्टीचा विचार करत नाहीस. दया उत्पन्न झाल्याने परत माघारी फिरलास तर तुझे शत्रू तुला चोहोबाजुंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था! तुझ्या या दयाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. हे सर्व महारथी, रणांगणातून तू घाबरून पळून गेलास असे मानतील.
पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, तुझे शत्रू तुझी वाटेल तशी निंदा करतील ह्या पेक्षा दु:खद गोष्ट काय असू शकते?
बोलितील तुझे शत्रु भलते भलते बहु । निंदितील तुझे शौर्य काय त्याहूनि दु:खद ।। 36 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला पळून जाण्याचे दुष्परिणाम सांगताना म्हणाले, हे कौरव तूला पकडून तुझी फजिती करतील आणि तूझ्या तोंडावर तुझी अमर्याद निंदा करतील ते मर्मभेदक निंदेचे शब्द ऐकून, तुझे अंत:करण विदीर्ण होईल. त्यापेक्षा आत्ताच शौर्याने का बरे लढत नाहीस? पुढील श्लोकात भगवंत युद्धाचे काय परिणाम होतील ते सांगताना म्हणाले, जर या युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील, विजयी झालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना दृढ निश्चयाने युध्दासाठी उभा राहा.
मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने मही-तळ । म्हणूनि अर्जुना उठ युद्धास दृढ-निश्चये ।। 37 ।।
श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितलं की, रणांगणावर युद्ध करताना तुझे प्राण खर्ची पडले तर स्वर्गसुख मिळेल आणि जर जिंकलास तर पृथ्वीचे साम्राज्य प्राप्त होईल. म्हणून आता कशाचाही विचार न करता ऊठ आणि हातात धनुष्य घेऊन युद्धास सुरुवात कर. तू क्षत्रिय असल्याने प्रजेचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे वागलास तर सर्व पातके नष्ट होतील. युद्ध करून स्वधर्माचे आचरण करणे हा राजमार्ग असताना युद्धामुळे पाप लागेल असे तुला कसे वाटले? अरे, नावेत बसून जाणारा कोणी बुडेल का? किंवा चांगल्या रस्त्यावरून चालताना ठेच लागेल का? पण नीट न चालणाऱ्याला ठेच लागू शकते, त्याप्रमाणे तुझ्यासारखा विपरीत विचार करून स्वधर्माचे आचरण न करणारा मात्र अधोगतीला जातो. दुध हे अमृतासमान आहे पण त्यात विष मिसळले तर ते पिल्याने मृत्यू येतो त्याप्रमाणे, स्वधर्म माहित असूनही चुकीचा विचार केल्यास अनर्थ ओढवल्यावाचून राहणार नाही. म्हणून हे अर्जुना! सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रिय धर्माने युद्ध कर, म्हणजे तुला मुळीच पाप लागणार नाही. स्वधर्माने वागत असताना मन:स्थिती कशी हवी ह्याबद्दल पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत.
हानि लाभ सुखे दु:खे हार जीत करी सम । मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुज ।। 38।।
अर्जुना, सुखाच्या वेळी संतोष मानू नको, दु:खाच्या वेळी खेद करू नकोस. दोन्ही प्रसंगी मन स्थिर ठेव. मनात फायद्यातोट्याचा विचार करू नकोस. या युद्धात आपल्याला जय मिळेल किंवा देहच नाहीसा होईल या दोन्ही गोष्टींचे चिंतन करत बसू नको. स्वधर्माने वागत असताना, जे कांही बरे-वाईट प्रसंग येतील ते शांतपणे सहन कर. अशा पद्धतीने वागण्याची मनाची तयारी झाल्याने तुझे मन शांत होईल. तुझ्याकडून पाप घडणार नाही. युद्धात कौरवांना मारल्याने आपल्याला पाप लागेल अशी तुला जी भीती वाटते आहे ती समूळ नष्ट होईल.
क्रमश: