15 गुणांचे 3 गेम्स पद्धतीला ‘बीडब्ल्यूएफ’ची मान्यता
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) डेन्मार्कच्या हॉर्सेन येथे आयोजित आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्येकी 15 गुणांचे 3 गेम ही गुण पद्धती स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला आवश्यक असलेली दोन तृतीयांश बहुमताची मते प्राप्त झाली. ही गुण पद्धती 4 जानेवारी, 2027 पासून अंमलात येईल.
जागतिक बॅडमिंटन संघ अध्यक्षा खुन्यिंग पटामा लीस्वदत्रकुल यांनी सांगितले की, हा निर्णय बॅडमिंटनच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आम्ही असा एक खेळ घडवत आहोत जो पुढच्या पिढीशी संवाद साधेल आणि त्याच वेळी आमच्या खेळाडूंच्या दीर्घकालीन भविष्यामध्ये गुंतवणूक करणेही सुरू ठेवेल, असे लीस्वदत्रकुल म्हणाल्या.
3×15 गुण पद्धतीचा उद्देश बॅडमिंटन अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक बनविणे, सुधारित वेळापत्रक, सामन्यांचा अधिक सुसंगत कालावधी आणि खेळाडूंचे कल्याण व त्यांच्या शारीरिक पुनऊज्जीवनासाठी संभाव्य फायदे मिळवून देणे हा आहे. उच्च दबावाचे क्षण सामन्यात लवकर आणून, गुणांमधील फरक कमी ठेवून आणि सामन्यांचा शेवट अधिक नाट्यामय बनवून हे स्वरूप चाहत्यांना पहिल्या रॅलीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत खेळाशी जोडून ठेवण्याचे उद्दिष्ट बाळगते, असे त्यांनी सांगितले.
हा निर्णय चाचणी, विश्लेषणानंतर आणि सदस्य व संबंधित घटकांशी केलेल्या दीर्घकालीन विचारविनिमयाच्या प्रक्रियेनंतर घेण्यात आला आहे. हा निर्णय महासंघाच्या सदस्यांची सामूहिक भूमिका दर्शवतो, असे या जागतिक संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू, माजी मुख्य प्रशिक्षक विमल कुमार आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल यांच्यासह भारतातील बॅडमिंटन क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी या निर्णयाबाबत यापूर्वीच काही आक्षेप नोंदवले होते आणि त्यांनी सध्याच्या 21 गुणांच्या पद्धतीलाच पसंती दर्शवली होती.
काही संबंधित घटकांनी उपस्थित केलेल्या चिंतांचे निरसन करताना, लीस्वदत्रकुल यांनी यावर भर दिला की, बॅडमिंटनचे मूळ स्वरूप अबाधितच राहील. ‘आम्हाला जाणीव आहे की, बदल झाल्यामुळे काही चिंता निर्माण होऊ शकतात. परंतु हा निर्णय बॅडमिंटनचे मूलभूत स्वरूप बदलत नाही. खेळातील कौशल्य, डावपेच, शारीरिक व मानसिक कस आणि खेळातील नाट्यामयता हे सर्व तसेच कायम राहील’स, याकडे त्यांनी लक्ष वेधले. बीडब्ल्यूएफ अॅथलीट्स कमिशनची अध्यक्ष असलेल्या सिंधूने यापूर्वी सूचित केले होते की, खेळाडू नवनिर्मितीसाठी तयार असले, तरी एकूण कल अजूनही 21 गुणांची प्रणाली कायम ठेवण्याकडेच आहे.