For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

... पण अजूनही 'भोंदूगिरी' संपलेली नाही !

04:57 PM Mar 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
    पण अजूनही  भोंदूगिरी  संपलेली नाही
Advertisement

मंगल - नाईक जोशी

Advertisement

'देवाचे अवतार' म्हणवून घेणारे स्वयंघोषित बुवा महिलांवर अत्याचार करीत असताना सुशिक्षित युवतींनी जाणीवपूर्वक जागरूक राहण्याची वेळ आलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील मुलींनी पुरोगामी विचार आणि विज्ञानाशी सख्य जोडले पाहिजे. खरे तर, महाराष्ट्राचे 'पुरोगामी' असणे म्हणजे ललाटी अभिमानाने टिळा मिरवावा, अशी गर्भश्रीमंत ओळख आहे. परंतु महाराष्ट्रात जे घडते आहे ते पाहता, पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न अक्षरशः अस्वस्थतेने भयथयाट करतो. श्रध्दा आणि अंधश्रद्धा समजून घेण्यामध्ये फार मोठी गल्लत होत आहे. माणसाच्या या अज्ञानाचा सोयीने लाभ उचलत स्वतःची तुंबडी भरणाऱ्या, राजविलास भोगणाऱ्या माणसाच्या ठायी देवत्व कसे असू शकेल?

तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!

Advertisement

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले || तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा || असे संत तुकारामांनी साडे तीनशे वर्षांपूर्वी सांगितले. हे खरे देवत्व असते. ते समाजाला दिशा देते. समाजाचे भले करते. अत्याचाराच्या ओरखड्यांनी समाजाला रक्तबंबाळ करीत नाही. पण दुर्दैवाने या देवत्वाकडे माणसांचा गोतावळा फारच कमी असतो. किंबहुना दुर्लक्षच असतो. संतांच्या उद्बोधनातून लक्षात येते की, भोंदूगिरीची वळवळणारी कीड ही काही आजकालची नाही. ही भोंदूगिरी म्हणजे माणसाला भविष्याच्या सुरक्षेची हमी देणारा केवळ आभास आहे. हे विशेषकरून महिला भगिनींनी लक्षात घ्यायला हवे. कारण बुवाबाबांच्या रडारवर महिला, मुली प्राधान्याने आहेत. आजवर ज्या बुवाबाबांना ऐश्वर्य सोडून तुरुंगात जावे लागले, त्या बुवाबाबांचेही 'महिला' लक्ष्य होते, हा इतिहास आहे. बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली त्यांना सजा झाली. माध्यमांनी त्या-त्या वेळी याविषयीचे वृत्त समाजाला दिले. तरीही समाज विशेषतः महिला वर्ग त्यातून धडा घेत नाही, हे दुर्दैव आहे.

स्त्री शक्तीचे सामर्थ्य मोठे, कवडीमोल ठरू नका!

आजूबाजूला अशा घटना घडत असताना महिलांनी वेळीच स्वतः सावध व्हायला नको का? कुणीही यावे, कसेही वागावे, सहज टपली मारून जावे, एवढा कवडीमोल आहे का महिला वर्ग? स्त्रीचा उल्लेख 'स्त्री शक्ती' असा केला जातो. मुळात, स्त्रीच्या ठायी प्रचंड सामर्थ्य असते. वेळप्रसंगी हाती नोकरी नसताना मोलमजुरी करून कुटुंब पोसण्याची हिंमत तिच्यात असते. ती व्यवहारात चोख असते. असे असताना प्रपंचात जरा कुठे खाटखुट झाले की बुवाबाबांचे पाय धरण्यात खरेच आपले हित आहे का? याचा विचार मुलींनी-महिलांनी करायला हवा. दुसऱ्या कुणीतरी आपल्याला अशा कुणाकडे जाण्याचा सल्ला दिला तरीही त्यावेळी स्वतःचा विवेक जागृत असायला हवा. बुवांचे उपाय थेट शरीरापर्यंत येऊन पोहोचत असतील तर तो सुखाचा मार्ग सांगणारा 'योगी' नाही, तर 'भोगी' आहे, हे समजायला नको का? महाराष्ट्राला संतांची, समाजसुधारकांची प्रगल्भ परंपरा आहे. आणि त्यांचे विचार आत्मसात करण्यातच जीवनाचे सार्थक आहे.

महिलांच्या श्रध्दाळूपणाचा गैरफायदा

श्रध्दा उत्कट असावी, अंध असू नये. अंधश्रद्धेत परिवर्तित झालेली श्रध्दा आपल्या कुणाच्याच हिताची नाही, हे सत्य आहे. सृष्टीतील नैसर्गिक घटना, त्यामागील विज्ञान समजून घेतले पाहिजे. सुशिक्षित मुलींकडून परंपरांचे पालन प्रथा म्हणून न होता डोळसपणे होणे आवश्यक आहे. मुळात महिला स्वभावाने श्रद्धाळू असतात. धार्मिक उपासना आवर्जून करण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. अशोक खरातसारखे भोंदू हे अचूक हेरून त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेतात. त्यांच्याशी गैरवर्तन करतात. तक्रार केल्यास कुटुंबास संपविण्याची धमकी देतात. हे फार भयानक आहे. याबाबत डोळ्यात जागृतीचे अंजन घालून सावध राहायला हवे.

अशोक खरात भोंदू पोलिसांच्या कचाट्यात सापडताच त्याच्याभोवती घोंघावत असणारे 'महानतेचे' वलय तात्काळ थिजून गेले. खरे रुपडे समोर आले, तेव्हा अशा माणसाशी ओळख असणेसुद्धा घृणास्पद ठरले आहे. या भयानक वास्तवाने अंतर्मुख करण्यास भाग पाडले. त्यातही अशिक्षित महिलांना या भोंदूगिरीस सामोरे जावे लागले असते तर मनाची समजूत घालता येणे सहजशक्य होते. परंतु, सुशिक्षित वर्गास भोंदूगिरी ओळखता येऊ नये, हे कुणाचे दुर्दैव म्हणावे? आता एक समाजकंटक ताब्यात आला तर भोंदूगिरीतून सुटका झाली, म्हणून बिनधास्तपणे सुटकेचा निःश्वास तरी कसा टाकायचा? हा आणखी एक प्रश्न.

सुखाच्या शोधात बुवाबाबाचा मार्ग

अलिकडे माणसाच्या प्रपंचात गुंतागुंत फार वाढली आहे. माणसाचे आयुष्य म्हणजे अप्रत्यक्षपणे सुखाच्या शोधाचा प्रवास आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळण्यासाठीची त्यात एक धडपड आहे. त्यात आयुष्यात कायमस्वरूपी सुरक्षितता हवी असते. त्यामुळे प्रत्येक बारीकमोठ्या समस्येवर त्याला मार्गदर्शन, उपाय अपेक्षित असतात. सुखाच्या शोधात आधीच नाडलेली माणसे योग्य मार्ग मिळण्यासाठी स्वयंघोषित बुवाबाबांचे पाय धरतात. पण हे स्वार्थी संधीसाधू त्यांना अधिक नाडून स्वतःची तुंबडी भरतात. गब्बर होतात. कष्टी माणसे सुखी तर होतच नाहीत, उलट त्यांचे शोषण होते. स्वतःच्या सुखाचा राजमार्ग कशात आहे? श्रध्दा आणि अंधश्रध्दा यामधील फरक काय, याचे शास्त्रशुद्ध शिक्षणच मिळालेले नाही. सागराला जशी भरती आहे, तशीच ओहोटीही आहे. नभोमंडळात जशी स्वच्छ चांदण्याची पौर्णिमा आहे, तशी काळ्याकुट्ट रात्रीची अमावस्याही आहे. जसा दिवस आहे, तशीच रात्रही आहे. शेवटी, माणसाचे जीवन म्हणजे सुख आणि दुःखाचा एक पट आहे. या महाराष्ट्रात संतांनी सुखी-समृद्ध जीवनाचे सोपे मार्ग सांगून ठेवलेले असताना ते धुडकावण्यात कोणता शहाणपणा आहे?

मुलांच्या मनावर हेच संस्कार का?

कित्येक मुले-मुली भोंदूगिरीच्या बळी ठरत आहेत. हाती पुस्तक आणि मनात उत्तम विचार पेरण्याच्या लहान वयात मुलांना या भोंदूबाबांची वाट दाखविली जाते. या निरागस मुली स्वतःहून जात नसतात, त्यांना त्यांचे पालक, परिचित या पाखंडींकडे नेतात. मुलांच्या भल्यासाठी डोळे झाकून या भोंदूंवर अंध विश्वास ठेवतात. या सगळ्या प्रकारात बालकांचे शोषण होतेच. शिवाय, नकळतपणे मुलांच्या मनावर हेच संस्कार आणि त्यांच्याकडून तसेच अनुकरण होणार नाही का? मुलांना जाणीवपूर्वक प्रयत्नवाद, विज्ञान, प्रत्येक गोष्टीमागील कार्यकारणभाव ओळखणे हे शिकविले गेले पाहिजे. त्यांना विज्ञानाची गरज, महत्त्व सांगितले गेले पाहिजे. काही वर्षांपूर्वी समाजातील निरक्षरता, अज्ञान या गोष्टींमुळे अंधश्रध्दांना खतपाणी घातले जात होते. पण आज साक्षरता आहे. हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. तरीही आम्ही मागेच आहोत!


दाखवूनिया वैराग्याची कळा, भोगी विषय सोहळा!

निस्सीम, निःस्वार्थी ईश्वरभक्ती, ईश्वरप्रेम म्हणजे 'श्रध्दा' आणि स्वतःची तुंबडी भरण्यासाठी दगडाला शेंदूर फासून देवाच्या नावाने मांडलेला खोटा पसारा म्हणजे 'अंधश्रद्धा'. सुमारे ३५० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज या भोंदूंगिरीविरोधात निर्भिडपणे उभे राहिले. ते म्हणाले, " ऐसे कैसे झाले भोंदू , कर्म करोनी म्हणती साधू | अंगी लावूनिया राख, डोळे झाकुनी करिती पाप | दाखवूनिया वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा| तुका म्हणे सांगो किती, जळो विषयांची संगती | "
आज इतक्या वर्षांनंतरही संतांच्या तिथी समाजात भक्तीभावात साजऱ्या होतात. पण त्यांच्या उपदेशाचे आचरण जर होत नसेल तर या भोंदूंना बळच अधिक मिळणार आहे. हा राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी मुलास नशीब, ज्योतिषाच्या स्वाधीन न करता प्रयत्नांच्या पराकाष्ठेचे, निव्वळ कर्मयोगाचे धडे दिले. या महाराष्ट्राला संतांची, समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. या परंपरेने समाजातील बुरसट विचार, कर्मकांड, करणी, आदी अघोरी प्रकारांवर प्रहार चढवून खऱ्या अर्थाने विचारांची, कृतीची शुद्धीकरण चळवळ राबविली. शिकलेल्या मुलींनी जाणीवपूर्वक भोंदूगिरीपासून दूर राहणे आवश्यक आहे. कारण अजूनही 'भोंदूगिरी' काही संपलेली नाही!महाराष्ट्राच्या थोर सुपुत्र-सुकन्यांनी महाराष्ट्रास मिळवून दिलेली पुरोगामीची ओळख अधिक ठळक आणि उठावदारपणे अधोरेखित व्हायला हवी. ही ओळख चिरंतन टिकवून ठेवायला हवी. नव्या पिढीचे शिलेदार असणाऱ्या युवक-युवतींची ही जबाबदारी आहे.

Advertisement
Tags :

.