व्यापाऱ्याचा बंगला फोडला; 17 तोळे सोने लंपास
उंब्रज :
उंब्रज (ता. कराड) येथील भांडी व्यावसायिक चंद्रशेखर मोहिरे यांचा बंगला अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 12 लाख रुपये किमतीचे 17 तोळे सोने लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. पुण्यावरून परत आल्यानंतर मोहिरे कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबतची माहिती उंब्रज पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायतीच्या पाठीमागे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उंब्रज येथील प्रसिद्ध भांडी व्यावसायिक मोहिरे यांचा ग्रामपंचायतीच्या पाठीमागे बंगला आहे. मोहिरे कुटुंबीय लग्नकार्यासाठी बंगल्यास कुलूप घालून पुणे येथे गेले होते. यादरम्यान बंद बंगल्याचा मागील स्वयंपाक घराचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात घुसून कपाटातील सुमारे 12 लाख रुपये किमतीचे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. पुण्यावरुन परत आल्यानंतर सदरची घटना मंगळवार 17 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कपाटातील कोल्हापुरी साज, अंगठी, चेन, कानातील रिंग, वेढणं, सोन्याच्या पाटल्या आदी दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. दाखल फिर्यादीवरून चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 6 लाख 90 हजार करण्यात आली आहे तर चालू दराने सदरचे सोने 12 लाख रुपये किमतीचे आहे.
उंंब्रज पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. याबाबतची फिर्याद सुनील विष्णू मोहिरे (रा. उंब्रज, ता. कराड) यांनी उंंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश भोसले करत आहेत.