सिंधुदुर्ग वनविभागाची ‘दडपशाही’ चव्हाट्यावर
उद्योजक नारायण जाधव यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे धाव
सावंतवाडी । प्रतिनिधी
जिल्ह्यातील कात उद्योजक नारायण दत्ताराम जाधव यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या बेकायदेशीर कारवाई आणि छळाविरुद्ध आक्रमक पाऊल उचलले आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना लेखी निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
कायदेशीर व्यवसायावर वनविभागाची वक्रदृष्टी?
नारायण जाधव हे कृषी उत्पन्न बाजार समिती, MSME आणि GST विभागाच्या सर्व कायदेशीर परवान्यांसह 'काजू हस्क'पासून कात बनवण्याचा व्यवसाय करतात. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणताही कायदा न जुमानता त्यांच्या कारखान्यावर वारंवार धाडी टाकून व्यवसाय ठप्प केल्याचा आरोप जाधव यांनी निवेदनात केला आहे.
कुटुंबाला रात्री ३ वाजेपर्यंत वेठीस धरले
निवेदनात नमूद केल्यानुसार, ९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाधव यांच्या पत्नी आणि मुलांना घराबाहेर उभे करून मानसिक त्रास दिला. कारखान्यात कोणतेही अवैध वनउपज नसतानाही १० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कारखाना सीलबंद करून फौजदारी गुन्हा (क्र. ३०१/२०२५) दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जाधव यांच्यावर असलेल्या १० कोटी २० लाखांच्या कर्जाचा डोंगर आणि कामगारांच्या उपासमारीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या: बेकायदेशीररित्या सीलबंद केलेला कारखाना आणि मालमत्ता तातडीने खुली करावी.,रात्री-अपरात्री कुटुंबाला त्रास देणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.,कायदेशीर उद्योजकाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी प्रशासनाने संरक्षण द्यावे.
मंत्रालयातून हालचाली सुरू होणार?
मुख्यमंत्री, वनमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे हे गाऱ्हाणे गेल्यामुळे आता सिंधुदुर्ग वनविभागाच्या या कारवाईची चौकशी होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. "मी एक प्रामाणिक करदाता असूनही मला देशोधडीला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आता केवळ मुख्यमंत्री आणि पालकमंत्रीच मला न्याय देऊ शकतात," अशी भावना नारायण जाधव यांनी व्यक्त केली आहे.