उद्योजक गोपाल खेमका यांची बिहारमध्ये हत्या
आरोपींचा शोध सुरू : राजकीय वातावरण तप्त
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास उद्योजक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी फरार झाले असून पोलिसांनी शनिवारी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते. उद्योजक गोपाल खेमका हे अपार्टमेंटसमोर आपल्या कारमधून खाली उतरत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. यामध्ये गुन्हेगारांनी हत्या कशी केली आणि घटनास्थळावरून पळून कसे गेले हे सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
गोपाल खेमका यांच्या हत्येनंतर राज्यात राजकीय वातावरणही तप्त झाले आहे. खेमका यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेल्या उपमुख्यमंत्र्यांवर तिच्या आईने राग व्यक्त करत ‘माझा मुलगाही भाजपमध्ये होता; मला न्याय हवा आहे’ अशी आर्त मागणी केली. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप करत नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वातील युती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हत्या करताच गुन्हेगार फरार
सीसीटीव्हीमधील दृश्यानुसार, एक गुन्हेगार हेल्मेट घालून खेमका यांच्या अपार्टमेंटबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. तर दुसरा फोनवर कोणाशी तरी बोलत होता. व्यापारी खेमका त्यांच्या कारमधून अपार्टमेंटमध्ये येताच हेल्मेट घालून उभ्या असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागताच, खेमका खाली पडले. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हत्या केल्यानंतर हल्लेखोर दुचाकी घेऊन पळून गेले.