For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्योजक सी. जे. रॉय आत्महत्या प्रकरण एसआयटीकडे

06:39 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्योजक सी  जे  रॉय आत्महत्या प्रकरण एसआयटीकडे
Advertisement

बेंगळूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वंशीकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली पथक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

रिअल इस्टेट उद्योजक आणि कॉन्फिडंट ग्रुपचे संस्थापक चेअरमन डॉ. सी. जे. रॉय यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटीकडे सोपविला आहे. बेंगळूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वंशीकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीचे विशेष पथक नेमण्यात आले आहे.

Advertisement

कॉन्फिडेंट ग्रुपचे चेअरमन सी. जे. रॉय यांनी शुक्रवारी कंपनीच्या कार्यालयात गनमधून स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. एका बड्या उद्योजकाच्या आत्महत्येमुळे उद्योग जगतात खळबळ माजली होती. सी. जे. रॉय यांच्या मालमत्तांवर डिसेंबरपासून प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी केली जात आहे. शुक्रवार आणि शनिवारीही त्यांच्या कंपनीसह निवासस्थानांवर छापे टाकून झडती घेण्यात आली. दरम्यान शुक्रवारी दुपारी कंपनीच्या कार्यालयात प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून चौकशी होत असताना फाईल आणण्यासाठी आपल्या रुममध्ये रॉय यांनी आत्महत्या केली होती.

प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असताना त्यांनी हे कृत्य केल्याने संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस नेत्यांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच सी. जे. रॉय यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान राज्य सरकारने शनिवारी या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास करण्याचा आदेश दिला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त वंशीकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीच्या पथकात बेंगळूर दक्षिण विभागाचे डीसीपी लोकेश जगलासर, बेंगळूर सेंट्रल विभागाचे डीसीपी अक्षय, हलसूर गेट पोलीस स्थानकाचे एसीपी सुधीर, सीसीआरबीचे एसीपी रामचंद्र, अशोकनगर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रवी यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.