‘व्यवसाय कर’ माफ तरीही वसुली सुरूच
महापालिकेचा अजब कारभार
10 महिला शिक्षिकांना दरमहा दोनशे रूपयांचा भुर्दंड
6 महिन्यापासून वेतनातून कपात
मागणीकडे दुर्लक्ष
कोल्हापूर
राज्य शासनाने 25 हजार रूपयांच्या आत वेतन असणाऱ्या महिला शिक्षिकांचा व्यवसाय कर माफ केला असतानाही महानगरपालिकेकडे नव्याने भरती झालेल्या शिक्षिकांच्या पगारातून दरमहा व्यवसाय कर वसुल केला जात आहे. याचा महापालिकेकडे कार्यरत असणाऱ्या 10 महिला शिक्षिकांना दरमहा भुर्दंड बसत आहे.
गेल्या 6 महिन्यापासून थेट वेतनातून कपात सुरू आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या अजब कारभारामुळे त्या शिक्षिकांच्या पगाराला दोनशे रूपयांची विनाकारण कात्री लागत आहे. विशेष म्हणजे जिल्हापरिषदेकडे सेवेत असणाऱ्या 25 हजारापेक्ष कमी पगाराच्या शिक्षिकांना व्यवसाय करातून सवलत दिली गेली आहे. मग महापालिकेच्या शिक्षिकांकडून कर का वसुल केला जातो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य व्यवसाय कर 2023-24 मधील तरतुदीनुसार ज्या महिला कर्मचाऱ्यांचे वेतन 25000 पेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांचा व्यवसाय कर राज्य शासनाने माफ करण्याचे ठरवले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचा आदेशही शासनाने काढला आहे. तरीही मनपा प्राथमिक शिक्षण समितीकडे कार्यरत असण्राया शिक्षणसेविकांचे वेतन 25 हजारापेक्षा कमी असुनही व्यवसाय कर म्हणून 200 रूपये पगारातून वसूल केले जात आहेत.
कर तत्काळ थांबावावा
गेल्या 6 महिन्यापासून व्यवसाय कर वसुल केला जात आहे. याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती. शासनाने कर माफ केला असतानाही शिक्षिकांकडून विनाकारण कर वसुल केला जात आहे. हा कर तत्काळ थांबवावा, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने करण्यात आली आहे.