मनपा कार्यक्षेत्रात मध्यरात्रीपर्यंत व्यवसायासाठी मुभा
सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अधिकृत आदेश जारी : लवकरच होणार अंमलबजावणी
बेळगाव : मनपा कार्यक्षेत्रामध्ये मध्यरात्री 1 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास व्यापाऱ्यांना मुभा देण्यात यावी, असा आदेश राज्य सरकारकडून राज्यातील दहा महानगरपालिकांना बजावण्यात आला आहे. बेळगाव मनपा कार्यक्षेत्रामध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत आदेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात राज्यात 10 महानगरपालिकांच्या व्याप्तीमध्ये मध्यरात्री 1 वाजेपर्यंत व्यावसायिकांना व्यापार करण्यास मुभा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सरकारने चार दिवसांपूर्वी सदर घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली आहेत. याबाबतचे सूचना पत्र संबंधित महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना जारी केले आहे.
तर मंगळवारी अधिकृतपणे या आदेशाची अंमलबजावणी करण्याची प्रत जारी करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाला मनपा व्याप्तीमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत व्यापार करण्यास व्यापाऱ्यांना मुभा देण्याबाबत विचार विनिमय करावा लागणार आहे. लवकरच या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्यासाठी तरतूद करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनाही सरकारकडून आदेशाची प्रत जारी केली आहे. त्यामुळे मनपा व्याप्तीमध्ये हॉटेल्स, मद्य विक्रेते, व्यावसायिकांना याची माहिती द्यावी लागणार आहे. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत आवश्यक असून यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार असल्याची शक्यता आहे.