शैक्षणिक सहलींसाठी बस सुसाट
पर्यटनस्थळांना भेटी : विविध मार्गावर 10 ते 15 बसेस
बेळगाव : शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाल्याने परिवहनच्या व्यावसायिक हंगामालाही सुरुवात झाली आहे. विविध मार्गावर शैक्षणिक सहलीसाठी बस धावत आहेत. त्यामुळे महसुलांच्या दृष्टिकोनातून परिवहनला दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात विविध ठिकाणी शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. यंदादेखील शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाला आहे. दररोज 10 ते 15 बसेस विविध मार्गावर धावू लागल्या आहेत. परिवहनकडून यात्रा-जत्रा, सण-उत्सव, पर्यटन स्थळे आणि सहलींसाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून महसूल वाढविला जातो. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने सहलीसाठी बसेस उपलब्ध करणे डोकेदुखी ठरणार आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात अधिवेशन असल्याने सहली, अधिवेशन आणि दैनंदिन प्रवासासाठी बसचे नियोजन करताना परिवहनचे तीन तेरा वाजणार आहेत.
सहलींसाठी बसचे नियोजन करताना कसरत
दरवर्षी परिवहनला शैक्षणिक सहलीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र गतवर्षीपासून शक्तीयोजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे दैनंदिन मार्गावर बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत सहलींसाठी बसचे नियोजन करताना कसरत होऊ लागली आहे. त्यामुळे परिवहनच्या जादा उत्पन्नावर परिणाम होताना दिसत आहे.
बसविना प्रवाशांची हेळसांड
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गावर धावत आहेत. त्यातच शक्ती योजनेमुळे बसेसची कमतरता जाणवू लागली आहे. अनेक मार्गावर बसविना प्रवाशांची हेळसांड होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन प्रवासाबरोबर शैक्षणिक सहलीसाठी नियोजन करताना परिवहनची डोकेदुखी वाढणार आहे.
शैक्षणिक सहलींना प्रारंभ
शैक्षणिक सहलींना प्रारंभ झाला आहे. दररोज 10 ते 15 बसेस शैक्षणिक सहलीसाठी विविध मार्गावर धावू लागल्या आहेत. परराज्यात 53 रुपये प्रती किलोमीटर तर कर्नाटकात 49 रुपये प्रति किलोमीटर असे भाडे निश्चित करण्यात आले आहे.
- अनंत शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर