बस तिकीट दरवाढ जारी
15 टक्क्यांनी वाढ : पुरुष प्रवाशांच्या खिशाला कात्री
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बस तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे याचा फटका पुरुष प्रवाशांना अधिक बसणार आहे. राज्य सरकारने चार वर्षांनंतर सरकारने परवानगी दिल्यानंतर परिवहन महामंडळाने बस तिकीट दरात 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. शनिवारी यासंबंधीचा अधिकृत आदेश देण्यात आला.
तिकीट दरवाढीमुळे परिवहन महामंडळाने वर्षाला 1,800 कोटी रुपयांचे संकलन करण्याचे उद्दिष्ट राखले आहे. तसेच परिवहनच्या सामान्य बसेसमधून कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास करण्याची ‘शक्ती’ योजना नेहमीप्रमाणे सुरु राहणार असून त्यात कोणताही बदल नसल्याचे सांगण्यात आले आहे.
शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र या राज्यांच्या तुलनेत कर्नाटक परिवहनच्या बसचा तिकीट दर कमी आहे, असे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. दर कि. मी.साठी किती तिकीट दर आहे, याचा तुलनात्मक तक्ताही केएसआरटीसीने प्रसिद्ध केला आहे.
यापूर्वी केएसआरटीसीने तिकीट दरात 33 टक्के आणि बीएमटीसीने 42 टक्के वाढ करण्यास परवानगी देण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. चर्चेनंतर चारीही निगमच्या बस तिकीट दरात 15 टक्क्यांनी वाढ करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. परिवहन कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, भत्तावाढीसाठी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला. आता सुधारित दर मध्यरात्रीपासून जारी करण्यात आला आहे.
तिकीट दरवाढीमुळे बेंगळूरहून बेळगावला जाणाऱ्या बसचा तिकीट दर 631 रुपयांवरून 725 इतका झाला आहे. तर बेंगळूर-हुबळी बस तिकीट दर 501 रु वरून 576 रु. होणार आहे.