महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुरळीत बससेवेसाठी उचगावात बस रोको आंदोलन

11:59 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेकवेळा सुरळीत बससेवेसाठी आंदोलन छेडून निवेदन दिले : तरीही बेळगाव डेपोला अद्याप जाग येईना : विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

उचगावमधून बेळगावला शाळा कॉलेजिसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवासी वर्गाने यापूर्वी अनेकवेळा सुरळीत बससेवेसाठी आंदोलन छेडले तर ग्रामपंचायतीने निवेदन देऊन देखील कर्नाटक बसखात्याच्या बेळगाव डेपोला अद्याप जाग येईना. यासाठी सोमवारी पुन्हा विद्यार्थी आणि प्रवाशांनी आंदोलन छेडून सुरळीत आणि नियमित बससेवा करावी, अन्यथा बेळगाव बस डेपोवर मोर्चा नेऊन संबंधित अधिकाऱ्याला घेराव घालून याचा जाब विचारू, असे बजावून बसखात्याचा निषेध केला. अखेर पाच तासांनी बसखात्याच्या डेपो मॅनेजर आणि काकती पोलीस स्टेशनचे पीएसआय यांनी भेट देऊन सदर बससेवा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर बसरोको आंदोलन मागे घेण्यात आले.

उचगावला बेळगाव बस डेपोतून नियमित बसेस येतात. मात्र गेल्या वर्षभरामध्ये या बसचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडलेले आहे. याचा परिणाम बेळगाव शहरात जाणाऱ्या शाळा कॉलेजीसमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर होत आहे. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या परीक्षा काळात बससेवा सुरळीत नसेल तर विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसे जावे? तसेच इतर शाळा कॉलेजीसमध्ये बससेवा सुरळीत नसल्याने अभ्यासाचे तास बुडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सातत्याने घडत आहे. मात्र याची खंत बेळगाव बस डेपोला नसल्याने उचगाव ग्रामस्थांमधून तसेच पालक आणि विद्यार्थी वर्गातून या बेळगाव बस डेपोचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

अतिवाड बस थांबत नसल्याच्या तक्रारी

बेळगाव बस डेपोची बस बेळगाव-अतिवाड मार्गावर धावत असते. अतिवाडकडे जाताना आणि अतिवाडहून पुन्हा बेळगावच्या दिशेने जाताना उचगाव बसस्थानकावर सदर बस ड्रायव्हर, कंडक्टर थांबवत नसल्याच्या सातत्याने तक्रारी विद्यार्थी वर्ग करत आहेत. तसेच उचगावच्या विद्यार्थ्यांना या बसमध्ये घेतले जात नाही. अशाप्रकारच्या तक्रारी विद्यार्थी वर्गातून करण्यात येत आहेत. उचगावची बस वेळेत आली नाही, तर अनेकवेळा उचगावच्या विद्यार्थी वर्गाला या बसवरच अवलंबून राहावे लागते. या अतिवाड बसने ये-जा करत असतात. मात्र या बसमधील ड्रायव्हर कंडक्टरच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीने दिले अनेकवेळा निवेदन

उचगावची बससेवा सुरळीत व्हावी, उचगावमधून बेळगाव शहराकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांची कुचंबणा थांबावी. यासाठी उचगाव ग्रामपंचायतीने बेळगाव बस डेपोला अनेकवेळा निवेदनही दिले आहे. यावेळी बस डेपोच्या मॅनेजरनी उचगावची बससेवा सुरळीत ठेवण्याचे आश्वासनही दिले होते. निवेदनानंतर दोन चार दिवस बस सुरळीत येत असल्याचे निदर्शनाला आले. मात्र ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती असल्याने आता विद्यार्थी आणि प्रवाशांनी कोणाकडे न्याय मागावा, अशी स्थिती झालेली आहे.

उचगाव फाट्यावरूनच बसेस वळविल्याने संताप

उचगावची बससेवा सुरळीत व्हावी, यासाठी उचगावला आलेल्या आणि अतिवाडहून परत बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या बसेस उचगावमधील विद्यार्थी आणि प्रवाशांनी सकाळी आठच्या सुमाराला या बसेस थांबवून रास्ता रोको आंदोलन छेडले असतानाच पुन्हा उचगावला येणारी दुसरी बस उचगाव बसस्थानकावर न येता बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील उचगाव फाट्यावरूनच प्रवाशांना तेथेच सोडून निघून गेल्याने उचगाव जनतेमध्ये या ड्रायव्हर, कंडक्टरच्या उद्धटपणामुळे संतापाची लाट पसरली होती.

बससेवा सुरळीत करण्याचे आश्वासन

उचगाव बसस्थानकावर थांबलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्रवाशांनी पुन्हा उचगाव फाट्यावर जाऊन हे आंदोलन छेडले. यानंतर दुपारी एकच्या सुमाराला बेळगाव बस डेपोचे अधिकारी तसेच काकती पोलीस स्टेशनचे पीएसआय यांनी उचगावला भेट देऊन मध्यस्थी करून सदर बससेवा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

वेळेत बस नसल्याने कॉलेजला पोहचण्यास उशीर होतो

कॉलेजला जाण्यासाठी आम्ही घरातून धडपड करत बस स्टॅण्डवर लवकर येतो. आणि वेळेत बस येत नसल्याने ताटकळत बस स्टॅण्डवर थांबावे लागते. आम्ही कॉलेजमध्ये वेळेत पोहोचू शकत नाही. आम्हाला कॉलेजपर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने कॉलेजमध्येही घेतले जात नाही. यामुळे आमचे अभ्यासाचे नेहमीच असे नुकसान होत आहे. यासाठी सरकारने याचा तातडीने विचार करून बससेवा सुरळीत ठेवावी आणि आमचे अभ्यासाचे होणारे नुकसान टाळावे.

- कु. प्रभावती बेनके, बसुर्ते

बसअभावी शिक्षकांकडून मार खावा लागतो

उचगावची बससेवा सध्या बिनभरवशाची झाल्याने शाळेला जावे की नाही हाच प्रश्न मनात घोळत असतो. बस वेळेत येत नसल्याने शाळेत पोहोचल्यानंतर  शिक्षकांकडून मार खावा लागतो. अभ्यासाचे तास चुकल्याने दुसऱ्या मुलांच्या वह्या घेऊन पुन्हा अभ्यास करण्याची वेळ आमच्यावर येत आहे. यामुळे आम्हाला अभ्यासात रसच राहत नाही. नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घरातून वेळेत निघतो. पण शाळेत मात्र वेळेत पोहोचत नाही. ही आम्हा विद्यार्थीवर्गाची कुचंबणा कधी थांबणार, नेतेमंडळीने याकडे लक्ष देऊन बससेवा सुरळीत करावी, अशी आमची विद्यार्थी वर्गाची मागणी आहे.

- कु. महेश राजगोळकर, उचगाव.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article