आंध्रप्रदेशात बस-रिक्षाची टक्कर, 7 जणांचा मृत्यू
चुकीच्या दिशेने रिक्षा वळल्याने दुर्घटना
वृत्तसंस्था/पलनाडू
आंध्रप्रदेशच्या पलनाडू जिल्ह्यात गुरुवारी एका बसने रिक्षाला टक्कर मारली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही दुर्घटना चिलकलूरिपेट तालुक्यात अड्डा रोडनजीक घडली आहे. संबंधित बस विजयवाडा येथून तिरुपतिच्या दिशेने जात होती. तर 15 प्रवाशांनी भरलेल्या रिक्षाने रस्त्यावर चुकीच्या दिशेने वळण घेतल्याने ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेवेळी बसचा वेग सुमारे 40 किलोमीटर प्रतितास इतका होता. तिरुपतिला जाणारी बस एका प्रवाशाकरता चिलकलूरिपेट नजीक पोहोचली होती. हा प्रवासी चढल्यावर बस नरसारावपेट बस स्टँडच्या दिशेने जात होती. याचदरम्यान बसची रिक्षासोबत टक्कर झाली आहे. दुर्घटनेत चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 3 जणांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला आहे.