परिवहन महामंडळासमोर बस नियोजनाचे आव्हान
बेळगाव : यात्रा आणि लग्नसराईला हळूहळू प्रारंभ होऊ लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. आधीच शक्ती योजनेमुळे बस सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच यात्रा, जत्रा हंगामासाठी बसचे नियोजन करताना परिवहनची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा असल्यामुळे हंगामी काळात नियोजन त्रासदायक ठरणार आहे. येत्या काळात विविध गावातून यात्रा आणि लग्नसराईला प्रारंभ होणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा परिवहनचा हंगाम म्हणून ओळखला जातो. या काळात विशेष बससेवेतून समाधानकारक महसूल प्राप्त होतो. मात्र परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने विविध मार्गांवर बससेवा पुरविताना दमछाक होणार आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बसेसचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्यातच येणाऱ्या यात्रा आणि लग्नसराईचा हंगामात परिवहन कसे नियोजन करणार हेच पहावे लागणार आहे.
प्रवाशांच्या संख्येत वाढ
पुढील आठवड्यात दड्डी-मोदगा येथील भावेश्वरी यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर इतर ठिकाणीही यात्रा होणार आहेत. त्याबरोबर लग्नसराईलाही हळूहळू प्रारंभ होत असल्याने बाजारासाठी शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बससेवेवर अतिरिक्त प्रवाशांचा ताण वाढणार आहे. दरम्यान बससेवा पुन्हा विस्कळीत होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचेही हाल
फेब्रुवारी, मार्च महिन्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सुरळीत बससेवा मिळणार का हेही पाहावे लागणार आहे. गतवर्षी परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे हाल झाले होते.