For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंदोलक मूठभर, पोलीस ढीगभर

11:15 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंदोलक मूठभर  पोलीस ढीगभर
Advertisement

म्हादईसाठी गोवा बसची अडवणूक : वाहतूक व्यवस्थेवर परिणाम

Advertisement

बेळगाव : म्हादई योजना राबविण्यामध्ये गोवा आणि महाराष्ट्र सरकारकडून आडकाठी घातली जात आहे, असा आरोप करत शेतकरी व कन्नड संघटनांनी चन्नम्मा चौकात आंदोलन केले. यावेळी गोवा परिवहनची बस अडवून आंदोलन केले. म्हादई पाणीपुरवठा योजनेचा वाद न्यायालयात सुरू असून याबाबत गोवा व महाराष्ट्र सरकारकडून आडकाठी आणली जात आहे. योजना राबविण्यात अडथळा निर्माण होत असल्याने राज्यातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे, असा आरोप करत कन्नड संघटना व शेतकऱ्यांकडून चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, चन्नम्मा चौकातून गोवाकडे जाणाऱ्या गोवा परिवहन मंडळाची बस चन्नम्मा चौकात आंदोलनकर्त्यांकडून अडविण्यात आली. यावेळी बससमोर आंदोलन करून रोखून धरण्यात आली. त्यामुळे चन्नम्मा चौकात वाहतूक कोंडी होऊन वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. आंदोलनाची माहिती असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 10 ते 12 आंदोलनकर्त्यांनी चन्नम्मा चौकात आंदोलन करून बस रोखून धरली असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मूठभर आंदोलकांसाठी ढीगभर पोलीस असतानाही बस रोखून धरण्यात आल्याने चौकात काहीकाळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला हटवून वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.