बस ओढ्यात कोसळली, 35 जखमी
कुरळप :
तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे पुणे-बेंगलोंर राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून एसटी बस ओढ्यात कोसळली. या अपघातात 30 ते 35 प्रवाशी जखमी झाले. जखमींना कोल्हापूर येथील शासकीय व इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. अपघाताची नोंद कुरळप पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दहिवडी बस डेपोची दहिवडी-जोतिबा एसटी बस (एमएच 34 बीटी 4203) ही जोतिबाकडे निघाली होती. तांदुळवाडी येथे गुरव पुलाजवळ बस येताच चालकाचा ताबा सुटल्याने बस पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये कोसळली. अपघातात 30 ते 35 प्रवासी जखमी व चालक गंभीर जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. बसमधील जखमी प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. बस चालक युवराज नामदेव मोहोर असून वाहक सौ. माधुरी दिलीप खरात यांनी कुरळप पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.