बस आगार कंगाल, खासगी वाहनधारक मालामाल
तीन दिवसात निपाणी आगाराला 18 लाखांचा फटका : प्रवाशांच्या सेवेतून खासगी वाहनधारकांची दिवाळी
वार्ताहर/निपाणी
दळणवळण व्यवस्थेमध्ये बस आगाराकडून दिली जाणारी प्रवाशांची सेवा महत्त्वपूर्ण मानली जाते. पण अलिकडच्या काळात राज्या-राज्यात होणारे वाद बससेवा व्यवस्थेला अडचणीत आणत आहे. असाच काहीसा प्रकार गेल्या तीन दिवसात आगार प्रशासनासह प्रवाशांना अनुभवावा लागला. चित्रदुर्ग येथे झालेल्या वादाचे परिवर्तन आंतरराज्य बससेवा ठप्प होण्यामध्ये झाले. तीन दिवस बससेवा बंद राहिल्याने प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले. बेळगाव व कोल्हापूर जिह्याच्या अधिकाऱ्यांनी यातून तोडगा काढत व्यवस्थेत सुधारणा केली आणि बंद राहिलेली बस व्यवस्था सुरू केली. तीन दिवसाच्या या कार्यकाळात निपाणी बस आगाराला मात्र 18 लाखाचा फटका बसला. मात्र तेच प्रवाशांना आवश्यक सेवा पुरवत खासगी वाहनधारक मात्र उत्पन्न वाढीतून मालामाल झाल्याचे चित्र दिसून आले.
निपाणी शहरातून महाराष्ट्रात कोल्हापूर, कागल, सांगली, इंचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज यासह अनेक शहरे व गावांना बससेवा दिली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातूनही कर्नाटकात प्रवाशांची संख्या लक्षात घेता बससेवा नियमितपणे दिली जाते. यामुळे दोन्ही राज्यांचा सलोखा या बससेवेच्या माध्यमातून स्पष्ट होतो. ही बससेवा असली तरी खासगी वाहन व्यवस्था मात्र अनेकांना रोजगारपूरक कार्य करत आहे. अनेकवेळा बेकायदेशीर वाहतूक व्यवसाय केल्याचा ठपका ठेवत खासगी वाहनधारकांवर कारवाई देखील केली जाते. निपाणीतच अशा प्रकारे अनेक वेळा कारवाई झाली देखील आहे. पण रोजगाराच्या निमित्ताने कारवाईकडे दुर्लक्ष करत खासगी वाहनधारक सेवा देताना दिसतात.
आगार प्रशासनाकडून काही ठिकाणी अनियमित सेवा दिली जाते. अशा ठिकाणी हे खासगी वाहनधारक सेवा देताना दिसतात. गावागावात रोजगाराच्या निमित्ताने खासगी वाहन व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी असून, रात्री-अपरात्री देखील ही वाहने प्रवासी वर्गाला सेवा देताना दिसतात. वादातून सलग तीन दिवस बससेवा ठप्प झाली. अशावेळी खासगी वाहनधारकांनी आपली प्रवासी सेवा सुरू केली. अनेक वाहनधारक निपाणी बसस्थानक परिसरात येऊ लागले आणि प्रवाशांना सेवा देत होते. महाराष्ट्रात परिसरातील नागरिकांचा मोठा संपर्क आहे. कामाच्या निमित्ताने अनेकजण दररोज प्रवास करत असतात.
पण अचानक आंतरराज्य बससेवा थांबवली गेल्याने अशा प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेष करून महिला वर्गाला याचा अधिक तर फटका बसला. अशावेळी खासगी वाहनांचा आधार घेत अपेक्षित प्रवास करण्यात प्रवाशांनी धन्यता मानली. खासगी वाहनधारकांकडून अधिकची रक्कम घेताना लूट होत असल्याचे बोलले गेले. पण प्रवाशांनी मात्र यामध्ये कुठेच तक्रार केली नाही. वाढते इंधनाचे दर आणि सेवा यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने बस आगाराच्या दरापेक्षा अधिक दर घेतला गेला. निपाणी आगारातून परिसरातील महाराष्ट्र राज्यातील विविध शहरे व गावांना दररोज 76 हून अधिक बसफेऱ्या सुरू असतात. तीन दिवसात 228 फेऱ्या रद्द झाल्या. यातून सुमारे प्रति दिवस 6 लाख याप्रमाणे 18 लाखाचा फटका प्रशासनाला सहन करावा लागला.