रावणदहन नि सीमोल्लंघन
साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि दुष्टांचा नाश करुन विजयाचा ध्वज उंचवायचा दिवस म्हणून भारतीय संस्कृतीत दसरा सणाला महत्त्व आहे, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. या दिवशी नवीन मोहीमा हाती घेतल्या जातात, सीमोल्लंघन केले जाते आणि नवरात्रीची शक्तीपूजा पूर्ण करुन शस्त्रपूजा केली जाते. शस्त्र आणि शास्त्र यांचं महत्त्व त्यानिमित्ताने उजळून निघते. एकुणच या दिवसाला त्यामागच्या विचारधारेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा कशाचे दहन करायचे, कशाचे सीमोल्लंघन साधायचे, कोणते शस्त्र हाती घ्यायचे आणि कोणता विजय मिळवायचा या बाबतीत व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आणि मानव म्हणून वेगवेगळे विचार असू शकतात, ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ असे म्हटले तरी आज महाराष्ट्रात आणि जगभर जी स्थिती आहे, आव्हाने, प्रश्न आहेत ते पाहता माणसांच्या निर्भेळ आनंदासाठीच मोहीम हाती घेण्याची आणि स्वत:वरच विजय मिळवत सर्वांच्या सुखाचा, आनंदाचा विचार करण्याची गरज आहे. दसऱ्याला सोने म्हणून आपट्याची पाने वाटतात. त्यामागेही निसर्गविचार आहे. जागतिक पातळीवर विविध देशांच्या अस्थिर अर्थव्यवस्थांमुळे सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. सोने खरेदी सर्वसामान्यांना आवाक्यात राहिलेली नाही. सोने आता लोक ‘ईटिएफ’वर खरेदी करतात. पण एकूणच ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. तरीही सोने, चांदी, हिरे दागिन्यांच्या शोरुम रोज नव्याने सुरु होत आहेत. ऑन व्हील आठवडी बाजारात सोने दागिने विक्री होताना दिसते आहे, ही बाब विसंगती वाटत असली तरी आठवे वेतन घेणारे कर्मचारी आणि लाडक्या बहिणी आपली हौस भागवून घेत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यंदा पावसाने जे थैमान घातले आहे आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रात आणि देशात विविध भागात जो हाहा:कार माजवला आहे तो दुर्लक्षित करता येणारा नाही. होत्याचं नव्हतं होणं म्हणजे काय याची अनूभूती बळीराजा घेतो आहे. मराठवाड्यात तर न भुतो असे संकटाचे आभाळ कोसळले आहे. केवळ पीक नाही शेतच वाहून गेले, विहिरी मुजल्या, घरसंसार बुडाला, पशुधन नष्ट झाले, झाडे पडली अशी अंगावर येणारी, मन सुन्न सुन्न करणारी दृष्ये आपण गेले आठ दिवस चित्रवाणीवर बघतो आहोत. माणसं रडत आहेत, तरुण शेतकरी हतबल झाले आहेत, शेतात पूराचे राज्य आहे, घर वाहून गेले, शाळा पाण्यात आहे, पुस्तके बुडली आहेत, दप्तर वाहून गेले आहे. एक ना दोन किती अडचणी, किती तडाखे सारे मती गोठवणारे. अशावेळी ‘दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा’ म्हणणे म्हणजेही पाप ठरेल, अशी स्थिती आहे. पाठोपाठची ढगफुटी, चक्रीवादळे, भूस्खलन भाजणारा उन्हाळा, गोठवणारी थंडी असे निसर्गाचे तडाखे पाठोपाठ का बसतात यात दोष कुणाचा असे विचारले तर सगळी बोटं आपल्याकडेच वळतात व सुखाच्या मागे लागलेला माणूस पर्यावरणाचे लचके तोडत आपलाच ख•ा आपण खोदतो आहे, हे त्याला समजतेय पण तो काही सुधारत नाही. त्यामुळे निसर्ग रौद्र होतो आहे. रोज नवनवे तडाखे देतो आहे. कार्बन उत्सर्जन आणि तापमान वाढ, वृक्षाची, जंगलाची हानी, जीवसृष्टीच्या साखळीत हस्तक्षेप त्यामुळे हे संकट येते आहे. एकेकाळी ढगाची उंची एक दोन मैल असायची आता ढग वीस वीस मैल उंचीचे तयार होत आहेत. हे ढग जेथे थांबतात तेथे ढगफुटी होते हे स्पष्ट झाले आहे. हे संकट नको असेल तर वसुंधरा वाचवली पाहिजे. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना आपली शताब्दी साजरी करते आहे. शताब्दीचा कार्यक्रम म्हणून त्यांनी पंचसूत्री जाहीर केली आहे. त्यामध्ये सामाजिक समरसता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आणि नागरी कर्तव्य हे ते पाच विषय आहेत. पर्यावरण संरक्षण हा विषय आहेच. संघ म्हणजे सेवाभाव आणि शिस्त ओघानेच हे काम वेग पकडेल. संघाने कुंटुंबजपणूक आणि समरसता असेही विषय घेतले आहेत. जोडीला स्वभाषा, स्वदेशी, कुटुंब संवाद यांचेही महत्त्व सर्वांना लक्षात आणून दिले आहे. आजच्या मानवजाती समोरच्या आणि हिंदुस्थान पुढच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये आहेत, जातीय, धार्मिक विद्वेष आणि ‘एक है हम’ अशी बंधूभावाची समरसता आज काळाची गरज बनली आहे. प्रश्नाचे उत्तर मिळालेले आहे. पण आपण व्यक्ती म्हणून आपले आपल्या पातळीवर योगदान दिले पाहिजे. या दसऱ्याला पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे. दिवाळी पूर्वी मराठवाड्यातील आपल्या बांधवांना मदतीचा हात देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत पण आपणही आपल्या घासातला घास या आपल्या बांधवांना दिला पाहिजे. तोच दसऱ्याचा विजयोत्सव आणि कर्तव्याचा मुहूर्त आपण तो साधूया, महापूरापेक्षा मदतीचा पूर मोठा असला पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असलेने राजकारणात रोज शिवराळ टीका टिपण्या आणि खालचे स्तर गाठले जात आहेत, द्वेषाचे सुरुंग पेरले जात आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणताही स्तर गाठला जातो आहे. यात कोणाला झाकावे व कोणाला गौरवावे हा प्रश्नच आहे. सध्या गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा सामना सुरु आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांना रोजच लक्ष केले जाते. राज्यात जातीय विद्वेष माजवला जातो आहे, सकाळचे भोंगे, दुपारचे भोंगे वाजत असतात, राजकारणाची उंची दाखवत असतात. मतपेटीसाठी व आरक्षणा वरुन मराठा विरुद्ध ओबीसी आणि हिंदू मुस्लिम असाही कडवा द्वेष पोसला जातो आहे. जो तो वैयक्तिक स्वार्थ साधताना मागे पुढे पहायला तयार नाही. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांचे टेरिफ आणि आर्थिक आघाडीवर साऱ्या जगाला त्यातल्या त्यात भारताला अडचणीत आणण्यासाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न काळजी वाढवणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशीची हाक दिली आहे. काही स्वदेशी अॅप नव्याने लाँच झाली आहेत. भीम अॅप आता रोज धावताना दिसते आहे. अनेक अॅपना भारतीय पर्याय आले आहेत ते सर्व भारतीयांनी वापरले पाहिजेत. एकीकडे जातीयवादाचे, असांस्कृतिक राजकारणाचे आणि महासंकटाचे राक्षस जाळताना स्वदेशीचा, समरसतेचा, एकतेचा, कुटुंब व्यवस्था बळकट करणेचा आणि पर्यावरण रक्षणाचा मंत्र जागवला पाहिजे. यात देशहित आणि मानवता हित आहे, हेच यावेळच्या दसऱ्याचे सीमोल्लंघन ठरावे. बाकी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे, ठाकरे बंधू युती, पंकजाताई मुंढेंचा भगवानगड मेळावा, सरसंघचालकांचे बौध्दीक, गोपीचंद पडळकर यांचा आरेवाडी दसरा हिंदू बहूजन मेळावा हे विषय आहेतच. स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुणाचा झेंडा लागणार हे महत्त्वाचे आहेच पण पूरग्रस्तांना मदत, आधार आणि आत्मविश्वास जोडीला आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हेच सीमोल्लंघन ठरावे. आपण सर्वांनी त्यासाठी पावलं उचलावीत आणि रावण दहन व सीमोल्लंघन साधावे.