शहापूरातील घरफोडी चोरट्यास अटक; ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, १२ दिवसात लागला छडा
वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली - बोरपाडळे राज्यमार्गावर शहापूर ता.पन्हाळा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या बंद घरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यास आज दि. १ रोजी कोल्हापूरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने काखे फाटा ता. पन्हाळा येथे अटक केली.इब्राहीम अब्बासअली शेख वय २४, रा. सुर्यवंशी मळा, कराड ता. कराड, जि. सातारा असे चोरट्यांचे नाव असून त्याच्या कडून सोन्याचे दागिन्यांसह इतर साहित्य असे एकुण ६ लाख २३ हजार ५५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणन्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे.
शहापूर येथील डॉ. कृष्णात आनंदराव पाटील यांचे घरी दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ वा. चे दरम्यान घर बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून त्यांचे घरातुन सोन्याचे दागिणे चोरुन नेलेबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस संपुर्ण जिल्ह्यामध्ये घडलेल्या घरफोडी चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करणे बाबत आदेशित केले होते त्यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्याचा समांतर तपास सुरु आहे. आज दि.१ रोजी पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे यांना त्यांचे गोपनीय खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार सातारा जिल्ह्यातील पोलीस अभिलेखावरील घरफोडी चोरी करणारा गुन्हेगार इब्राहीम शेख हा आज रोजी काखे फाटा मार्गे कोडोली, ता. पन्हाळा येथे एच. एफ. डिलक्स मोटर सायकलवरुन येणार आहे. या मिळाले माहिती नुसार सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक, संदीप जाधव, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, रणजित कांबळे, सुशिल पाटील यांचे तपास पथकाने आज काखे फाटा येथे जावून सापळा लावून आरोपी इब्राहीम शेख यास पकडले असता त्याचे कब्ज्ञात ११४ ग्रॅम सोन्याचे दागिणे व इतर साहित्य असा एकुण ६ लाख २३ हजार ५५० रु.किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्यास पुढील कारवाई करीता कोडोली पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास कोडोली पोलीस ठाणे कडून सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षकमहेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक, सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक, संदीप जाधव, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, रणजित कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील व सुशिल पाटील यांनी केली आहे.