खानापूर तालुक्यात सहा गावात घरफोडी
सावरगाळीत मोठी चोरी : 15 लाख रोख, 18 तोळे सोने, अर्धा किलो चांदीचे दागिने लंपास
खानापूर : तालुक्यात पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्री गुंजी, सावरगाळी, शिंपेवाडी, बरगांव, रामगुरवाडी, गणेबैल या सहा गावांत 10 बंद घरे फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. सावरगाळी येथील नारायण भेकणे, ओमकार भेकणे यांच्या घरातील 15 लाख रुपये रोख रकमेसह 16 तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चोरीची पद्धत पाहता आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सावरगाळी येथे श्वानपथक आणि ठस्से तज्ञांना पाचारण करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुऊ आहे. बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस प्रमुख बसरगी आणि बैलहोंगल विभागीय उपअधिक्षक विरय्या हिरेमठ यांनी खानापूर पोलीस स्थानकात भेट देवून तपासासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
सावरगाळीत मोठी चोरी
रविवारी रात्री सावरगाळी, गुंजी, शिंपेवाडी, बरगाव, रामगुरवाडी, गणेबैल येथील दहा बंद घरे लक्ष्य करुन चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. नंदगड पोलीस कार्यक्षेत्रातील सावरगाळी येथील नारायण भेकणे आणि ओमकार भेकणे यांचे बंद घर फोडून 15 लाख रोकडसह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. नारायण भेकणे हे आपल्या बहिणीकडे सर्व कुटुंबासह जाफरवाडी येथे गेले होते. तर त्यांचे भाऊ ओमकार हे रात्री उशीरा आपल्या पत्नीच्या गावी संगरगाळी येथे गेले. रविवारी रात्री उशिरा चोरट्यांनी गावात प्रवेश करुन भेकणे आणि घाडी यांच्या दोन्ही घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटे फोडून कपाटातील सामान विस्कटून शोधाशोध केली असता त्यांच्या हाती 15 लाख रुपये रोख आणि 16 तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीचे दागिने भेकणे यांच्या घरी हाती लागले.
तसेच यांच्या शेजारी बाळू घाडी यांच्या घरातील कपाट फोडले असता दोन तोळ्याचे दागिने हाती लागले. बाळू घाडी हे व्यवसायानिमित्त रत्नागिरी येथे राहतात. त्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी आपल्या आईला रत्नागिरी येथे नेले होते. त्यामुळे दोन्ही घरे बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी आपला डाव साधला. दोन्ही घरांना नवे दोन कुलूप लावून चोरट्यांनी पलायन केले. त्यामुळे गावातील रहिवाशांना चोरी झाल्याचे समजले नाही. जेव्हा ओमकार भेकणे हे आपल्या सासरवाडीहून घरी आले आणि कुलूप बदलला असल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना विचारणा केली. कुलूप तोडून प्रवेश केला असता घरातील सामान अस्ताव्यस्त पसरले असल्याचे दिसून आले. कपाट उघडे असल्याचे दिसल्यावर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तातडीने याबाबतची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली.
श्वानपथक, ठसे तज्ञांना पाचारण
नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक रविकुमार धर्मट्टी आणि उपनिरीक्षक बदामी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. माहिती घेतल्यानंतर तातडीने श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने भेकणे यांच्या घरापासून महामार्गापर्यंत मार्ग काढला आणि तेथेच घुटमळत राहेले. ठसे तज्ञांनी ठशांचे नमुने घेतले आहेत. सायंकाळी उशीरा जिल्हा पोलीस प्रमुख बसरगी तसेच बैलहोंगल विभागीय उपअधिक्षक विरय्या हिरेमठ यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत खानापूर आणि नंदगड पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
महिलेच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबला, चाकूचा धाक दाखवून चोरी
रामगुरवाडी येथील रुक्मिणी विठ्ठल गुरव यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला असता रुक्मिणी यांनी आरडाओरडा करताच तिच्या तोंडात कापडाचा गोळा केंबून चाकूचा धाक दाखवून सोने आणि पैसा कोठे आहे, अशी विचारणा केली. त्याचवेळी चोरट्यांनी तेथे शोधाशोध केली असता त्यांच्या हाती फक्त तीन हजार रुपये लागले. यानंतर चोरट्यानी रुक्मिणी यांना ढकलून देवून तेथून पोबारा केला. यानंतर रात्री 3 वाजता रुक्मिणी यांनी आरडोओरड करत शेजारी असलेल्या पिंटू शिंदे यांना उठवले. शिंदे यांनी रुक्मिणी यांना धीर देवून आपल्या घरी ठेवून सकाळी याबाबतची माहिती खानापूर पोलिसांना दिली. खानापूर पोलिसांनी रामगुरवाडी येथे श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वानपथक घरापासून थोड्याच अंतरावर घुटमळत राहिले. गुंजी, बरगाव, गणेबैल, रामगुरवाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलिसाकडून करण्यात येत आहे. एकाच रात्रीत सलग घरफोडी झाल्याने पोलिसानी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
सुगीच्या हंगामात चोरटे सक्रिय
आता पुढील पंधरा दिवसांत भात कापणीला सुरवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून सुगीच्या हंगामात दिवसा आणि रात्री चोरी होण्याच्या प्रकार वारंवार घडत होते. पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठ तोळे सोने सुरक्षित राहिले
सावरगाळी येथील भेकणे यांच्या घरातील माडीवरील कपाटात आणखी 5 तोळे सोने होते. मात्र चोरट्यांनी माडीवर प्रवेश न केल्याने चोरट्यांपासून सोने सुरक्षित राहिले. ज्या कपाटात 15 लाख रुपये लंपास केले त्याच कपाटातील साडीत आणखी 20 हजार रुपये होते. मात्र ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. बाळू घाडी यांच्या घरातील जुन्या ट्रकांत तीन तोळे सोने होते. चोरट्यांनी जुना ट्रंक न उघडल्याने त्यातील तीन तोळे सोने सुरक्षित राहिले.