आटपाडीत घरफोडी,8 तोळे दागिने लंपास
आटपाडी :
आटपाडीमध्ये चोरट्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचे बंद घर फोडून आठ तोळ्याहून अधिक सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे शेजारी राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घराला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी हात साफ केला. या घटनेमुळे चोरट्यांची सक्रियता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
आटपाडी येथे पंचायत समितीच्या मागील अपार्टमेंटमध्ये नगरपंचायतचे मुख्याधिकारी भाड्याने राहतात. त्याच इमारतीत आटपाडी पोलीस ठाण्याचे सपोनि व अन्य मंडळी वास्तव्यास आहेत. मुख्याधिकारी वैभव हजारे व कुटुंबिय घराला कुलुप लावुन गुरूवारी गावी गेले होते. ही संधी शोधून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री या इमारतीतील मुख्याधिकाऱ्यांच्या घराचा कोयंडा तोडुन आत प्रवेश केला.
हे करताना चोरट्यांनी शेजारी इतरांच्या घराला बाहेरून कड्या लावल्या. मुख्याधिकाऱ्यांच्या घरातील कपाटील साहित्य अस्ताव्यस्त विखरून मंगळसूत्र, अंगठ्या, अन्य दागिने असे सुमारे 8 तोळेचा ऐवज लंपास केला. अन्य साहित्याची चोरी केली. ही घटना शनिवारी सकाळी उजेडात आली. आटपाडी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांचेच घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. हे करत असताना तेथेच वास्तव्यास असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घरालाही कडी घालुन चोरट्यांनी दहशत निर्माण करत आटपाडी पोलिसांना आव्हान दिले आहे.
मागील काही दिवसात आटपाडी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये विलक्षण वाढ झाली आहे. दिघंची आणि परिसरात भर दिवसा चाकुचा धाक दाखवुन चोऱ्या घडल्या. तसेच बनपुरी येथे दिवसाढवळ्या घरात घुसून ऐवज लंपास करण्यात आला. या चोऱ्यांमुळे पोलिसांपेक्षा चोरटे शिरजोर झाल्याचे सिध्द झाले असून आटपाडी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.