आरवडेत घरफोडी,दोन लाखाचा ऐवज लंपास
सांगली
आरवडे (ता.तासगाव) येथील तासगाव भिवघाट रस्त्यालगत असणारी जयसिंग शिवाजी मोरे व वसंत शिवाजी मोरे या दोन भावांची तासगांव रस्त्यालगतची घरे अज्ञात चोरटयांनी दिवसाढवळ्या फोडून सोने, चांदी व रोख रक्कम यासह दोन लाख ऊपयांचा ऐवज चोरटयांनी डल्ला मारला. सदर घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटना दुपारी 12 ते दुपारी 2 च्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भर वाहतुकीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घरफोडी झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गावातील जयसिंग शिवाजी मोरे ( वय 68 वर्षे) हे आपली पत्नी शकुंतला यांच्यासह आरवडे येथे तासगाव - भिवघाट असलेल्या आपल्या घरी राहतात. मंगळवारी सकाळी ते तासगाव येथे दवाखान्यात गेले होते.दुपारी 2 वाजता दवाखान्यातून घरी आले असता घराचे दार उघडे असलेले त्यांना दिसले. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांना दिसले. घरातील लोखंडी कपाटातील साहित्य विसकटेले होते. या कपाटात असणारे गळ्यातील भोर माळ, लक्ष्मी हार, 50 ग्राम वजनाचे चांदीची जोडवी व रोख दहा हजार ऊपयांचा असा एकूण अंदाजे चार लाख ऊपये किंमतीचा ऐवज चोरटयांनी लंपास केला.
तर शेजारीच असलेले त्यांचे भाऊ वसंत शिवाजी मोरे यांच्या घरी दुपारच्या वेळी कामानिमित्त बाहेर असल्याने घरी कोणीच नव्हते. अज्ञात चोरट्यानी त्यांच्याही घराचा लोखंडी दरवाजाची कडी तोडून घरामध्ये प्रवेश करून घरी असलेले लाकडी कपाटातील साहित्य विस्कटले होते. मात्र येथे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनेची पोलसांत नोंद झाली असून आधिक तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक बदणे, सोमनाथ वाघ, पोलीस कॉन्स्टेबल शिवजी मंडले, निलेश डोंगरे यांनी भेट दिली.