खेडमध्ये 2 लाखांची घरफोडी! बंद घरातील सोन्याचे दागिने लांबवले, अज्ञात चोरट्यावर गुन्हा
खेड प्रतिनिधी
खेड शहरात ऐन गणेशोत्सवातच बंद असलेले घर फोडून कपाटातील 2 लाख 18 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून शहरात वास्तव्यास असलेले काहीजण गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी आपआपल्या गावी गेले आहेत. दादा महादेव देवरूखकर हे घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून पत्नी व मुलांसह बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने धारदार हत्याराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले 2 तोळे 850 ग्रॅम वजनाचे व 2 लाख 18 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला.
देवरूखकर कुटुंबीय घरी परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लांबवल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. पोलीस स्थानकात धाव घेत घरफोडीची तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.