घरफोडी प्रकरणातील चोरट्यांना 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
सावंतवाडी-
सावंतवाडी शहरात मागील महिन्यात सालईवाडा भागात एकाच वेळी चार ठिकाणी झालेल्या घरफोडीतील चोरट्यांना जेरबंद करण्यास सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेला यश आले आहे. घरफोडी प्रकरणी दोघा सराईत चोरट्यांना रायगड जिल्ह्यातून शुक्रवारी जेरबंद केले. सलीम महंमद शेख (३५) व तौफिक मोहम्मद शेख( 30 ) दोन्ही सध्या रा. कळंबोली येथील आहेत. या दोघांनी घरफोडी केल्याची कबूली पोलिसांना दिली. सालईवाडा सर्वोदयनगर येथील रघुनाथ गवस यांचे बंद घर फोडून ५ हजार रुपये तसेच ज्ञानेश्वर पाटकर यांचे बंद घर फोडून 25 हजार रुपये व राजेंद्र देसाई यांची मोटरसायकल लंपास केली होती. या घरफोडी प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला झाला होता. सावंतवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग हे घरफोडीच्या चोरट्यांचा शोध घेत होते. अखेर जिल्हा पोलीस यंत्रणेला अखेर यश आले. अटक केलेल्या दोघा चोरट्यांना शनिवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता गणेश पाटोळे यांनी बाजू मांडली.