सहा महिन्यांनंतर घरफोडीचा छडा
18 लाखांचा ऐवज हस्तगत : चोरीप्रकरणी युवकाला अटक
बेळगाव : मंडोळी रोड, भवानीनगर येथील एका घरफोडीचा सहा महिन्यांनंतर छडा लावण्यात आला आहे. यासंबंधी भोई गल्ली येथील एका युवकाला अटक करून त्याच्याजवळून 17 लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. निलेश भरमा सुतार (वय 41) मूळचा राहणार भोई गल्ली, सध्या राहणार संभाजी गल्ली, मंडोळी असे त्याचे नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर,उपनिरीक्षक संतोष दळवाई, लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
1 जानेवारी 2026 रोजी मंडोळी रोड, भवानीनगर येथील रोहन राजेश जाधव यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यांच्या घरात चोरीची घटना घडली होती. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकात सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल, अमित रुपन्नावर, शिवकुमार कांबळे, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद, दीपक दोडगोनी आदींचा समावेश आहे. निलेश सुतारच्या मुसक्या आवळून त्याच्याजवळून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे 75 ग्रॅम सोने, 10 लाख 90 हजार रुपये किमतीची 4 किलो 178 ग्रॅम चांदी असा एकूण 17 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.