मठ गल्ली येथे घरफोडी
50 ग्रॅम सोने, दोन तोळे चांदीचे दागिने पळविले
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. मठ गल्ली येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली असून मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
प्रकाश आण्णासाहेब खोत यांच्या घरी चोरी झाली आहे. प्रकाश व त्यांची पत्नी शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून चन्नम्मानगरला गेले होते. चन्नम्मानगर येथे नव्या घराचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी कूपनलिका खोदण्यासाठी हे दाम्पत्य मठ गल्लीतून तेथे गेले होते. रात्री 7 वाजता ते आपल्या घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील 50 ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन तोळे चांदी पळविली आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे 7 लाख रुपयांहून अधिक होते. घटनेची माहिती मिळताच मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, उपनिरीक्षक हुसेन केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. गेल्या एक- दोन महिन्यापासून शहर, उपनगर व तालुक्यातील बंद घरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. चोऱ्या, घरफोड्या नित्याचेच झाले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी बंद घरांना भेटी देण्याचा उपक्रमही सुरू केला आहे. परगावी जाताना जवळच्या पोलीस स्थानकांना किंवा पोलीस दलाच्या व्हॉटस्अॅप नंबर माहिती दिल्यास पोलीस अशा घरांना सातत्याने भेटी देऊन पाहणी करणार, असा तो उपक्रम आहे. परगावी नको केवळ काही तासांसाठी घराला कुलूप लावून बाहेर जाणाऱ्यांची घरेही चोरट्यांनी लक्ष्य बनविली आहेत.