For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाळेकुंद्री खुर्दच्या सरकारी मराठी शाळेत चोरी; गावात खळबळ, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

02:40 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाळेकुंद्री खुर्दच्या सरकारी मराठी शाळेत चोरी  गावात खळबळ  चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
Advertisement

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत पुन्हा एकदा चोरी व तोडफोडीची घटना घडल्याने गावात खळबळ उडाली आहे. शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वर्गखोल्यांची कुलपे तोडून आत प्रवेश केला. गेल्या दोन-तीन महिन्यांत शाळेत दुसऱ्यांदा चोरी व तोडफोड झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, या प्रकाराला आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या कार्यालयातील दोन तिजोऱ्यांची कुलपे तोडली असून, त्यातील साहित्य चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले असून, काही पुस्तके फाडण्यात आली आहेत. वर्गखोल्यांतील साहित्याची नासधूस करण्याबरोबरच दरवाजांचीही मोडतोड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, शाळेतून बाहेर पडताना अज्ञात व्यक्तींनी विद्युत मीटरचेही नुकसान केले. वर्गखोल्यांमध्ये तसेच भिंतींवर लावण्यात आलेल्या विविध माहितीपत्रकांचीही नासधूस करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Advertisement

या घटनेची माहिती शाळा सुधारणा समिती व शिक्षकांनी माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज जाधव यांना दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेतील नुकसानीची पाहणी करून संबंधित विभागाला माहिती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ग्रामपंचायत तसेच मारिहाळ पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली असून, पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गेल्या काही महिन्यांत शाळेत वारंवार चोरी व तोडफोडीच्या घटना घडत असल्याने शाळेची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळेच्या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, तसेच या घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक, शाळा सुधारणा समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे.

शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे केंद्र असून, अशा घटनांमुळे शैक्षणिक साहित्याचे नुकसान होण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.