बुमराहचे आघाडीचे स्थान कायम
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने आपले आघाडीचे स्थान पुन्हा कायम राखले आहे.
कानपूरमध्ये नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्याकसोटीत बुमराहने 6 गडी बाद केले होते. या मालिकेत रवीचंद्रन अश्विनला ‘मालिकावीराचा’ बहुमान मिळाला. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय संघातील अष्टपैलु रविंद्र जडेजाने कसोटी मानांकन यादीत सहावे स्थान तर कुलदीप यादवने 16 वे स्थान घेतले आहे. कानपूरच्या दुसऱ्या कसोटीत सामनावीर पुरस्कार मिळविणाऱ्या जैस्वालने फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जैस्वालने या कसोटीत पहिल्या डावात 72 तर दुसऱ्या डावात 51 धावा जमविल्या होत्या. या यादीत यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत दहाव्या स्थानावर राहिला. कर्णधार रोहीत शर्मा 15 व्या तर शुभमन गिल 16 व्या स्थानावर आहेत.
कसोटी अष्टपैलुंच्या ताज्या मानांकन यादीत फारसा फेरबदल झालेला नाही. भारताच्या रविंद्र जडेजाने आपले अग्रस्थान कायम राखले असून रवीचंद्रन अश्विनी दुसऱ्या तर अक्षर पटेल सातव्या स्थानावर आहे. सांघिक मानांकनात भारत 120 रेटींग गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 124 रेटींग गुणासह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड 108 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशीप गुणतक्त्यात भारतीय संघाने 11 सामन्यानंतर 74.24 गुणांची सरासरी राखली असून ऑस्ट्रेलिया 12 सामन्यानंतर 62.50 गुणांची सरासरी राखत दुसरे स्थान मिळविले आहे.