आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये 907 गुण बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा
आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या रँकिंगमध्ये गोलंदाजीचा 907 हा आकडा गाठून नवा विक्रम रचला आहे. बुमराहने अलीकडेच निवृत्त झालेल्या फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही मागे टाकत हा विक्रम रचला आहे. आर. अश्विनने 2016 मध्ये 904 गुणांचे सर्वोच्च रेटिंग प्राप्त केले होते. अश्विन पाठोपाठ बुमराह या बाबतीत भारतीय इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, याआधी, कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी क्रमवारीत 904 पेक्षा जास्त रेटिंग गुण मिळवता आले नव्हते. आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम रेटिंग गुण मिळवणारा पॅट कमिन्स हा एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे. कमिन्सच्या नावावर ऑगस्ट 2019 मध्ये 914 रेटिंग गुण होते.
ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत बुमराह आतापर्यंतचा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 4 कसोटीत 30 बळी घेत कांगारुंची दमछाक करण्यात तो यशस्वी ठरला आहे. मेलबर्न कसोटीत 9 विकेट घेताना त्यानेया विक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसीने नुकतंच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात जसप्रीत बुमराह 907 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आयसीसी क्रमवारीत सर्वाच्च रँकिंगसह भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताच्या कोणत्याही गोलंदाजाने हा आकडा गाठला नाही. अश्विनने 2016 मध्ये 904 गुणांना स्पर्श करत पहिले स्थान काबिज केले होते. मागील आठवड्यात बुमराह या गुणांसह अश्विनच्या पंगतीत बसला होता. मात्र मेलबर्न कसोटीत 9 विकेट घेत त्याच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. बुमराहसाठी 2024 वर्ष संस्मरणीय राहिले आहे. त्याने 21 आंतरराष्ट्रीय सामन्यात 13.76 च्या सरासरीने 86 विकेट घेतल्या आहेत. यात 5 वेळा 5 विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. तर 13 कसोटी सामन्यात 71 विकेट घेतल्या आहेत. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या 4 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या आसपास दुसरा गोलंदाज नाही, हे विशेष.
आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वोच्च रेटिंग गुण असलेले भारतीय गोलंदाज
- 907 - जसप्रीत बुमराह 2024
- 904 - आर अश्विन 2016
- 899 - रवींद्र जडेजा 2017
- 877 - कपिल देव 1980
- 859 - अनिल कुंबळे 1994
जोस हेजलवूड, पॅट कमिन्सचीही झेप
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडला एका स्थानाचा फायदा झाला असून ताज्या क्रमवारीत तो 843 गुणासह दुसऱ्या तर पॅट कमिन्स 837 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा 832 गुणासह चौथ्या, तर मार्को यानसेन 803 गुणासह पाचव्या स्थानी आहे. बुमराहशिवाय टॉप-10 मध्ये केवळा एका भारतीय गोलंदाजाचा समावेश आहे. फिरकीपटू रविंद्र जडेजा 750 गुणासह दहाव्या स्थानी आहे.
यशस्वी जैस्वालला एका स्थानाचा फायदा, जो रुट अव्वलस्थानी
मेलबर्नमध्ये दोन्ही डावात अर्धशतके झळकावणारा भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल 854 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला मागे टाकले. इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानावर कायम आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रुक दुसऱ्या तर न्यूझीलंडचा केन विल्यम्सन तिसऱ्या स्थानावर आहे.