रोहितनंतर बुमराह भारताचा कर्णधार होईल!
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे मालवणमध्ये भाष्य : कसोटी क्रिकेटच भविष्यात टिकेल!
मनोज चव्हाण/मालवण
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती अचानक घेतलेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर तो निवृत्ती घेईल, असे वाटले होते. मात्र त्याने थोडा विलंब करीत निवृत्ती घेतली आहे. तो निवृत्ती घेईल तसेच इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही, याची कल्पना होती. रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह हाच भारताचा कसोटी संघाचा कर्णधार होईल. आपण नेहमीच फलंदाजांकडे लक्ष देतो. मात्र गोलंदाज म्हणून बुमराहने केलेली कामगिरी मोठी आहे. बुमराह हा सध्या भारताचा नंबर वन खेळाडू आहे, तो एक महान खेळाडू असून सध्याचा फॉर्म बघता इतर कोणताही खेळाडू त्याच्या जवळपास नाही. त्यामुळे कसोटी कर्णधार बुमराह होईल, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू आणि जागतिक क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केली.
सध्याचे 20-ट्वेंटी क्रिकेट हे क्रिकेटचा एक ट्रेंड आहे. आमच्या काळात प्रशिक्षण वेगळे दिले जायचे. फलंदाजाने एखादा बॉल सोडल्यास प्रशिक्षक खुश व्हायचे आणि एखादा बॉल हवेत मारला की शिक्षा द्यायचे. मात्र आताच्या टी-20 क्रिकेटमध्ये चेंडू सोडले की फलंदाज बदलला जातो. आमच्यावेळी क्रिकेट शिकविण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आम्हाला जसे शिकवले तसे आम्ही खेळलो. म्हणूनच तासन्तास खेळायला मला आवडायचे. आज आयसीसीकडून कसोटी क्रिकेटला स्पर्धात्मक ऊप दिले गेले आहे, त्याबद्दल आयसीसीचे कौतुक आहे. कसोटी क्रिकेट नक्कीच टिकेल. वनडे क्रिकेट कधीतरी संपून जाईल आणि 20-ट्वेंटी क्रिकेटचा ट्रेंड बदलत जाईल. ज्यांना त्यामध्ये खेळायचे आहे, ते खेळत राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
श्री. मांजरेकर म्हणाले, क्रिकेट एक ताकद आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात क्रिकेट आहे. आयपीएलमुळे क्रिकेट आणखी प्रसिद्ध झाले आहे. क्रिकेट अभ्यासक्रमात येत असेल, तर चांगलेच आहे. तसेच येथील स्थानिक खेळाडूदेखील उच्च पातळीपर्यंत जाऊन क्रिकेट खेळू शकतात. सुविधांची कमतरता आहे, असे मी कधी मानत नाही. पाकिस्ताननेदेखील त्याकाळी त्यांच्याकडे कमी सुविधा असतानाही वर्ल्डकप जिंकला होता. खेळाडूंकडे मेहनत व संयम हवा. मला केवळ कसोटी क्रिकेटपटू समजू नका. हाँगकाँग येथे झालेल्या एका पाच ओव्हरच्या क्रिकेट स्पर्धेत आपण चांगली कामगिरी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मंद म्हणजे जास्त बॉल आणि जास्त वेळेत शतक करण्यात आपला दुसरा क्रमांक आहे, असेही मांजरेकर म्हणाले.
‘आयपीएल’ प्रोफेशनल क्रिकेट
‘आयपीएल’मधील कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी यामधील कामगिरीत फरक पडत असतो. आयपीएल हे घरगुती क्रिकेट आहे. यशस्वी जयस्वालसारख्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कसोटी कामगिरी अलीकडच्या काळात खालावली असली, तरी आयपीएलमधील कामगिरी चांगली आहे. संजू सॅमसन सध्या आयपीएलमध्ये चांगला खेळला नाही, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने हल्ली चांगली कामगिरी केली. सर्व कामगिरीची सांगड घालून खेळाडूंची निवड केली जात असते. येत्या इंग्लंडच्या दौऱ्यासाठी यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी लक्षात घेऊन खेळाडू निवडले जातील. आयपीएल हे केवळ पैसा कमवण्यासाठी खेळतात, असे म्हणणे उचित होणार नाही. नोकरीला जाणाऱ्याला आपण कधी तो पैसे कमवायला जातोय, तो वाईट आहे, असे आपण कधी म्हणतं नाही. तसेच आयपीएल एक प्रोफेशनल क्रिकेट आहे. आयपीएलमध्ये येणाऱ्या पैशातून अनेक चांगल्या गोष्टीही घडत आहेत, असे ते म्हणाले.
मालवणची माणसे खूपच इंटरेस्टिंग आहेत!
मालवणशी माझे नाते आहे. माझे वडील व आजी यांचे मूळ येथे आहे. वेंगुर्ला व सावंतवाडी येथे मी आलो होतो, मात्र मालवणला पहिल्यांदाच आलो आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मालवण ग्रेट ठिकाण आहे. मालवणची माणसे खूपच इंटरेस्टिंग आहेत, त्यांचे मला आकर्षण आहे. पु. ल. देशपांडे यांनी मालवणच्या लोकांवर नक्कीच काहीतरी लिहिलेले आहे, तेही अविस्मरणीय आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया संजय मांजरेकर यांनी व्यक्त केली.