रोहित शर्मा अनुपलब्ध झाल्यास बुमराहकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/मुंबई
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांस्तव अनुपलब्ध झाल्यास जसप्रीत बुमराह उपकर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व करेल, असे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. स्पष्टवक्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या माजी सलामीवीराने के. एल. राहुलच्या अनुभवाचा आधार घेण्यात येईल याचे पुरेसे संकेत दिले आहे.
भारतीय संघाची दुसरी तुकडी सोमवारी पर्थला रवाना झाली असून वैयक्तिक कारणांमुळे रोहित पहिली कसोटी खेळेल की नाही हे निश्चित नाही आणि गंभीरनेही त्याची पुष्टी केली नाही. ‘याक्षणी कोणतीही पुष्टी झालेली नाही, परंतु आम्ही तुम्हाला परिस्थिती काय असेल यासंदर्भात नक्कीच कळवू. तो उपलब्ध होईल अशी आशा आहे. बुमराह उपकर्णधार आहे. साहजिकच जर रोहित उपलब्ध नसेल, तर तो पर्थमध्ये नेतृत्व करेल’, असे गंभीर म्हणाला.
रोहित खेळू न शकल्यास सलामीचे एक स्थान रिकामे होईल आणि भारतातर्फे खेळण्याची संधी न मिळालेला अभिमन्यू ईश्वरन आणि के. एल. राहुल हे दोघेही भारत ‘अ’तर्फे ऑस्ट्रेलिया ‘अ’विऊद्ध सामने खेळलेले असल्याने त्यांच्यापैकी एकाची निवड केली जाईल, असे गंभीरने स्पष्ट केले. असे नाही की, पर्याय नाहीत. या स्थानाच्या बाबतीत बरेच पर्याय आहेत. पहिला कसोटी सामना जवळ आल्यावर आम्ही सर्वोत्तम संघ खेळविण्याचा प्रयत्न करू, असे तो म्हणाला. तथापि, राहुलचा अनुभव ईश्वरनच्या सध्याच्या फॉर्मवर भारी ठरू शकतो, याचे संकेत गंभीरने दिले आहेत.
‘काही वेळा अनुभवी खेळाडूलाही पसंती द्यावी लागते. राहुल क्रमवारीत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो तिसया क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि सहाव्या क्रमांकावरही फलंदाजीस येऊ शकतो. असे वैविध्य राखण्यासाठी खूप प्रतिभा असणे आवश्यक असते. त्याने एका दिवसाच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणही केलेले आहे. किती देशांकडे राहुलसारखे खेळाडू आहेत जे सलामीला येऊ शकतात आणि सहाव्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतात ? म्हणून मला वाटते की, गरज पडल्यास आणि विशेषत: जर रोहित पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसेल, तर राहुल जबाबदारी पेलू शकतो’, असे गंभीर यावेळी म्हणाला.
नितीश राणाच्या निवडीचे समर्थन
गंभीरने अष्टपैलू नितीश राणाच्या निवडीचेही समर्थन केले आहे. त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजीची सरासरी 21 असली, तरी आगामी मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला डावलून राणाची निवड करण्यात आली आहे. हे पुढे जाण्यासंदर्भात देखील आहे आणि मला असे वाटते की, देशासाठी आम्ही निवडलेला हा खेळाडूंचा सर्वोत्तम संच आहे, असे सांगून गंभीरने सूचित केले की, शार्दुलसाठी सध्या दरवाजे बंद झाले आहेत.
शार्दुल हा गब्बावरील भारताच्या नायकांपैकी एक होता आणि त्याने तेथे काही बळी मिळविण्यासह अर्धशतकाची नोंद केली होती. ‘आम्ही सर्वोत्तम संघ निवडला असून नितीश रे•ाr किती प्रतिभावान आहे ते सर्वांना माहीत आहे. जर त्याला संधी दिली, तर तो आम्हाला उपयोगी ठरले, असे गंभीरने आंध्रच्या खेळाडूच्या निवडीचे समर्थन करताना सांगितले.
हर्षित राणा हा ऑस्ट्रेलियातील भारत ‘अ’ संघाचा भाग राहिला नाही. त्याविषयी बोलताना गंभीर म्हणाला की, आसामविऊद्ध तो प्रथम श्रेणी सामना खेळला (त्यात त्याने पाच बळी घेतले तसेच अर्धशतक केले) आणि त्याने चांगली कामगिरी केली. आम्हा सर्वांना असे वाटले की, त्याला आणखी एका प्रथम श्रेणी सामन्यासाठी पाठविण्यापेक्षा त्याने पुरेशी गोलंदाजी केलेली आहे.
‘आमच्यासाठी वेगवान गोलंदाजाने ताजेतवाने असणे महत्त्वाचे आहे. हा मोठा दौरा असून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणारी आहे. त्याचा विचार करता गोलंदाजी प्रशिक्षक, फिजिओ आणि ट्रेनर्सना वाटले की, तो पुरेसा खेळलेला आहे. हे त्यामागचे एक कारण आहे, असे गंभीर पुढे म्हणाला.
मोहम्मद शमी नसताना जसप्रीत बुमराहवर वेगवान गोलंदाजीचा भार वाहण्याचे प्रचंड दडपण राहणार आहे. असे असले, तरी गंभीरला वाटते की, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीप या तीन अननुभवी वेगवान गोलंदाजांसह देखील भारतीय मारा प्रभावी आहे. ‘आमच्याकडे गुणवत्ता आहे. आमच्याकडे प्रसिद्ध आणि हर्षितसारखे लांब खेळाडू आहेत जे खेळपट्टीवर चेंडू उसळवू शकतात. पाचही खेळाडूंचे कौशल्य भिन्न आहे. त्यामुळे आमचा वेगवान मारा खूप प्रभावी आहे’, असे मत त्याने व्यक्त केले.
पुढचे 10 दिवस महत्त्वाचे
सोमवारी भारतीय संघाच्या दुसऱ्या तुकडीसोबत रवाना झालेल्या गंभीरने सांगितले की, पुढील 10 दिवसांत ऑस्ट्रेलियातील परिस्थितीशी जुळवून घेणे संघासाठी महत्त्वाचे असेल. आमच्याकडे अनेक अनुभवी खेळाडू आहेत, जे ऑस्ट्रेलियाला अनेकदा गेले आहेत. त्यांचा अनुभव युवा खेळाडूंनाही उपयोगी पडेल. पुढील 10 दिवस खूप महत्त्वाचे राहणार आहेत. पण 22 तारखेला सकाळी आम्ही पूर्णपणे सज्ज असले पाहिजे, असे तो म्हणाला.