आयसीसी मासिक पुरस्कारासाठी बुमराहचे नामांकन
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहचे डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत शानदार प्रदर्शन केली होती. या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स व दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन पॅटरसन यांनाही नामांकन मिळाले आहे.
डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या तीन कसोटीत बुमराहने 14.22 धावांच्या सरासरीने 22 बळी मिळविले तर पाच सामन्यांत त्याने 32 बळी टिपले. शेवटच्या सिडनी कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मात्र त्याला दुखापतीमुळे गोलंदाज करता आली नाही. त्याने ब्रिस्बेन व मेलबर्न कसोटीत प्रत्येकी 9 बळी घेत शानदार प्रदर्शन केले. त्याच्या या कामगिरीमुळे मालिकेत भारताचे आव्हान कायम राहिले होते.
या पुरस्कारासाठी बुमराह, पॅट कमिन्स व डेन पॅटरसन यांच्यात चुरस लागणार आहे. कर्णधार कमिन्सने भारतावर 3-1 असा मालिका विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावताना 3 कसोटीत 17.64 च्या सरासरीने 17 बळी टिपले. अॅडलेडमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी 57 धावांत 5 बळी मिळविल्याने ऑस्ट्रेलियाला 10 गड्यांनी विजय मिळविता आला. त्याने फलंदाजीतही 49 व 41 धावा जमविल्या. आफ्रिकेच्या पॅटरसनने लंका व पाकविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 2 कसोटीत 16.92 च्या सरासरीने 13 बळी मिळविताना आपल्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.