For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू काश्मीरमध्ये बंपर मतदान

06:48 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरमध्ये बंपर मतदान
Advertisement

विधानसभा  निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात 56 टक्क्यांवर मतदान

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर दुपारी 1 वाजेपर्यंत 41 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65 टक्के मतदान झाले होते. तसेच दिवसअखेर प्राथमिक अंदाजानुसार 56 टक्क्यांवर मतदान झाले असून अंतिम टक्केवारीनुसार हा आकडा 60 टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. एकंदर निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात नंदनवनात बंपर मतदान झाले आहे.

Advertisement

कलम 370 रद्द केल्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील 24 विधानसभा जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुऊवात झाली. यामध्ये काश्मीरमधील 16 आणि जम्मूमधील 8 जागांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सुरक्षा दल आणि यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय निवडणूक आयोगाने विस्थापित काश्मिरी पंडितांसाठीही विशेष व्यवस्था केली होती. जम्मू आणि उधमपूरमध्ये विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी विशेष मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

दुपारी 3 वाजेपर्यंतचा आढावा

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65 टक्के मतदान झाले आहे. अनंतनागमध्ये 46.67 टक्के, दोडामध्ये 61.90 टक्के, किश्तवाडमध्ये 70.03 टक्के, कुलगाममध्ये 50.57 टक्के, पुलवामामध्ये 36.90 टक्के, रामबनमध्ये 60.14 टक्के आणि शोपियानमध्ये 46.84 टक्के मतदान झाले. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

13 पक्षांमध्ये स्पर्धा

जम्मू काश्मीरमध्ये एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी मतदार पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या सर्व टप्प्यांचे निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहेत. 90 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 13 प्रमुख पक्षांमध्ये स्पर्धा आहे. प्रादेशिक पक्षांपैकी मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी आणि ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स या निवडणुकीत ठळकपणे रिंगणात आहेत. नॅशनल कॉन्फरन्स प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

Advertisement
Tags :

.