इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीसाठी बंपर सवलती
60 हजार ते 4 लाख रुपयांपर्यंत सूट मिळण्याचे संकेत : विविध कंपन्यांच्या नव्या आकर्षक ऑफर्स
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
ग्राहकांना आता नवीन वर्षात इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याची नवी संधी निर्माण होणार आहे. आतापर्यंत ईव्ही कार्स खरेदी करण्यासाठी जादा रक्कम जमा करावी लागत असल्याच्या कारणास्तव ग्राहकांचा कल तिकडे कमी राहिला होता. परंतु आता नवीन संधी निर्माण होत असून ग्राहकांना सवलतीच्या दरात कार खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती देत आहेत. विविध ब्रँडच्या ई-कार्सवर वर्षाच्या अखेरपर्यंत 60,000 ते 4 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. 31 डिसेंबर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, ह्युंडाई मोटार, एमजी मोटार आणि टाटा मोटार सर्वाधिक सवलती देण्याचे संकेत आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीसही कंपन्यांनी ई-वाहनांवर सवलत दिली होती, परंतु त्यावेळी कमाल सवलत केवळ 2-2.5 लाख रुपये होती. साहजिकच यावेळी सवलत खूप जास्त आहे. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फाडाचे अध्यक्ष (संशोधन आणि अकादमी) विंकेश गुलाटी म्हणाले, ‘कंपन्या आणि डीलर्स सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यामुळे लोक पेट्रोल-डिझेल वाहनांऐवजी ई-व्ही खरेदी करण्यास प्राधान्य देऊ शकतात.
महिंद्रा आणि ह्युंडाईच्या काही मॉडेल्सवर 4 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. डीलर्सचे म्हणणे आहे की महिंद्रा आणि ह्युंडाईच्या बॅटरी वाहनांवर सवलत जास्त आहे आणि काही मॉडेल्सवर 4 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. चेन्नईच्या एका डीलरने सांगितले की, सवलत आणखी वाढवण्यात आली आहे. ते म्हणाले, ‘ह्युंडाई कारची ऑन-रोड किंमत सुमारे 25.13 लाख रुपये आहे आणि आम्ही कंपनी आणि डीलरकडून सूट जोडून एकूण 4 लाख रुपयांनी कारची किंमत कमी करत आहोत. ह्युंडाई मोटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी या महिन्यात सांगितले होते, किरकोळ विक्रीच्या दृष्टीने डिसेंबर हा सर्वोत्तम महिन्यांपैकी एक आहे. टाटा मोर्ट्सच्या काही डीलर्सकडून या महिन्यात नेक्सॉन, टीयागो आणि टीगोरच्या इलेक्ट्रिक मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी ईव्ही आहे. त्याचे नवीन मॉडेल आले असून जुने मॉडेल बनणे बंद झाले आहे. पण डीलर्सकडे जुना स्टॉक पडून आहे.