बुलकचा ‘नव्या शब्दांची वाटचाल’ कार्यक्रम
बेळगाव :
बुलकच्या शुक्रवार दि. 26 च्या बैठकीत ‘नव्या शब्दांची वाटचाल’ या कार्यक्रमात दत्तू पाटील, पल्लवी, नंदीश कम्मार व वेदांत फडके यांनी त्यांचे पुस्तक, लेखन प्रवास व प्रकाशन प्रक्रिया याबद्दल आपले अनुभव कथन केले. दत्तू यांनी आपला लष्करी प्रवास, लेह-लद्दाख, भारत-चीन सीमा प्रदेश, असह्या थंडी, पॅराशूटमधून टाकण्यात येणारे अन्नपदार्थ, गोठणारे झरे, ओढे व त्यावरून चालण्याचा अनुभव, बर्फ गरम करून पाणी बनविणे अशा कठीण परिस्थितीत सैनिक देशाची सुरक्षा इमानेइतबारे करतात, असे सांगितले. पल्लवी यांनी कविता लेखन कसे सुरू केले, कविता स्पर्धेत भाग घेत कधी यश तर कधी अपयश मिळाले, मात्र आज एक कविता संग्रह प्रकाशित केल्याचे सांगितले. नंदीश यांनी आत्मचरित्रांचा प्रभाव कसा पडला, अडखळत बोलत होतो तेव्हा टोस्ट मास्टर व बुलकचे अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांचे सहकार्य कसे मिळाले. ‘लिखेगा इंडिया मिशन’मधील सहभाग व स्वत:चे पुस्तक याबद्दल माहिती दिली. वेदांत फडके यांनी हिंदी सिनेमाचा आपल्यावरील प्रभाव सांगून परीची कथा सांगत अहंकार आला की शक्ती संपते असे सांगून ‘बनाने पडते है हिम्मतसे रास्ते’ असे सांगून आपल्या पुस्तकाचा परिचय करून दिला. राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात किशोर काकडे यांनी स्वागत केले. रंजना कारेकर यांनी सर्वांना पुस्तक दिले. यानंतर चाय पे चर्चा झाली.