Bullock Cart Race: बैलगाडी शर्यतीत तुफान राडा, दोघांना मारहाण, 4 जणांवर गुन्हा दाखल
तब्बल 3 आठवड्यानंतर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुलाची शिरोली : गावाची यात्रा आणि उरुसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवेळी झालेल्या वादातून स्पर्धक बैलगाडी मालक असलेल्या दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यामध्ये मारहाण करणाऱ्या चौघांवर तब्बल तीन आठवड्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बैलगाडी मालक सुदर्शन नाना कदम, अमोल नाना कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज मानसिंग पाटील, शैलेंद्र शशिकांत पाटील, श्रीधर पाटील, रोहित तथा गोटू कौंदाडे या चौघांवर शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, (दि. ५ मे) रोजी यात्रा आणि उरुसानिमित्त शिरोलीच्या वीट भट्टी माळावर समितीच्या वतीने बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सुदर्शन आणि अमोल कदम या भावांनी आपली बैलगाडीसह भाग घेतला होता. अंतिम टप्यात शर्यतीच्या नियमावरून कदम बंधू आणि मनोज पाटील यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी मध्यस्थी करून मारामारी सोडवली. त्यानंतर कदम बंधू बैलगाडी टेंपोत भरत असताना मनोज पाटील याने सुदर्शन कदम यास लोखंडी रॉड आणि पाईपने बेदम मारहाण केली.
यावेळी अडवण्यास आलेल्या अमोल कदम यालाही मारहाण केली. मनोज याचे साथीदार शैलेश पाटील, श्रीधर पाटील व रोहीत तथा गोटू कौंदाडे यांनी कदम बंधूना शिवीगाळ करीत घट्ट धरून ठेवले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुदर्शन व अमोल कदम यांना उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.
उपचारानंतर सुदर्शन कदम यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेल्यानंतर पोलीसांनी फिर्याद घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. त्यानंतर कदम यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे वकीलांमार्फत शिरोली एमआयडीसी पोलीसांना कळविल्यानंतर अखेर २४ मे रोजी रात्री उशीरा मनोज पाटील, शैलेश पाटील, श्रीधर पाटील, रोहित कौंदाडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सपोनि. सुनिल गायकवाड यांच्या मागदर्शना खाली हवालदार शिंदे करत आहेत.