For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात बुधवारी परतली तेजी

06:57 AM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात बुधवारी परतली तेजी
Advertisement

सेन्सेक्स 332 अंकांनी वधारला, बँकेचे समभाग तेजीत, आयटी घसरणीत

Advertisement

यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी झालेल्या खरेदीने बुधवारी देशातील शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. सेन्सेक्स 332 अंकांनी तर निफ्टी 99 अंकांनी वधारत बंद होताना दिसला. बँक निफ्टी निर्देशांक वधारत तर दुसरीकडे आयटी निर्देशांक घसरत बंद झाला.

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 332 अंकांच्या वाढीसह 74,336 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी देखील 99 अंकांच्या वाढीसह 23,217 वर बंद झाला. बाजाराला बँकिंग आणि एफएमसीजी समभागांनी मजबुतीसोबत आधार दिला. नफावसुलीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी आपली तेजी गमावली. पण अखेर काहीशा तेजीसह बंद होण्यात बाजाराला यश आलं. निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये घसरण झाली असली तरी निफ्टी मिडकॅप 100 ने संपूर्ण घसरण भरून काढली. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी एफएमसीजी प्रत्येकी 1.5 टक्क्यांच्या तेजीसह वधारलेले दिसले. तर निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक अर्ध्या टक्क्याहून अधिक तेजीसह बंद झाला. रियल्टी निर्देशांकही जवळपास 1 टक्के वाढला होता आणि निफ्टी ऑटोमध्ये जवळपास अर्धा टक्का वाढ झाली. दरम्यान, निफ्टी आयटी निर्देशांकावर मात्र दबाव दिसून आला. हा निर्देशांक 1.5 टक्क्यांहून अधिक घसरलेला होता. फार्मा व इन्फ्रा यांचे निर्देशांक दबावात होते. सीपीएसई व कमोडिटीज यांचे निर्देशांक काहीशा तेजीसह कार्यरत होते.

बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मूल्य 15 सप्टेंबर 2026 रोजी 4,73,62,906.90 कोटी रुपये होते. जे 16 सप्टेंबर 2026 रोजी घसरून 4,73,03,060.96 कोटी रुपयांवर आले. म्हणजेच बुधवारी गुंतवणूकदारांच्या भांडवलात 59,845.94 कोटींची घट झालेली पाहायला मिळाली.

कोण तेजीत, कोण घसरणीत

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स तेजीत राहिले होते. आयटीसी, एसबीआय आणि अॅक्सिस बँकेने सर्वाधिक वाढ नोंदवली. तर टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टीत एचडीएफसी लाइफ,एसबीआय लाइफ, नेस्ले इंडिया व जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे विप्रो, बजाज फिनसर्व्ह व लार्सन टुब्रो यांचे समभाग घसरत बंद झाले. मिडकॅपमध्ये पतंजली फुडस, पीबी फिनटेक, वन 97, टाटा कम्युनिकेशन, मॅरीको हे समभाग तेजीत तर कल्याण ज्वेलर्स, एनएलसी इंडिया, एम्फासिस, ओरॅकल फायनॅन्शीयल यांचे समभाग घसरणीत होते.

Advertisement
Tags :

.